गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:10 AM2022-11-16T08:10:26+5:302022-11-16T08:11:00+5:30

Eknath Shinde : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Take measures to prevent measles infection, Chief Minister Eknath Shinde directs Mumbai Municipal Corporation | गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

Next

मुंबई : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.  
ज्या मुलांना गोवरची लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तिथे आवश्यक ती औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढवून बाधितांचे सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
याबाबत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क राहून उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

तातडीने लसीकरण मोहीम राबवा - लोढा  
 मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
 हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण तसेच स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  

स्वच्छ मुंबईसाठी १८८ कोटींची तरतूद
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म, उद्याने, मंडई, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटनस्थळे, फ्लायओव्हर या ठिकाणांची मिशन मोडमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. 

आरोग्य विभागाच्या रडारवर झोपडपट्ट्या, गोवराच्या रुग्ण संख्येत वाढ
मुंबई : गोवर या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.  या आजारासाठी आरक्षित करून ठेवलेला महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाचा कक्ष रुग्णांनी भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत ज्या भागातून गोवराचे रुग्ण सापडले त्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर बहुतांश सर्व रुग्ण झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांवर ‘गोवर’च्या नजरेतून लक्ष केंद्रित करणार आहे. 
कोरोनाच्या काळातही मुंबई महापालिकेने शहरातील मोठ्या झोपडपट्ट्यांकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांत मुंबईत विशेष करून गोवंडी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी ज्या एका बालकाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला त्या बाळाचे कुटुंब नळ बाजार येथील एका वस्तीमधील आहे. त्यामुळे सगळेच संशयित रुग्ण हे दाटीवाटीच्या लोक वस्तीतील आहेत. 
कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत पुरळ आणि ताप येत असलेले ६१ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. हे बहुतांश रुग्ण गोवंडी परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. तो एका रुग्णातून दुसऱ्या रुग्णामध्ये पसरण्याची मोठी शक्यता आहे. वैज्ञानिक भाषेत, गोवरच्या आजाराचे एकाच परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असतील तर त्याला त्या आजाराचा उद्रेक म्हणून जाहीर केले जाते. तसाच काहीसा प्रकार गोवंडीत झालेला आहे. 
या संदर्भात मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आरोग्य विभाग दाटीवाटीच्या लोक वस्तीवर कायमच लक्ष केंद्रित करत असतो. आरोग्य विभागाचे नियमितपणे सर्वेक्षण या भागात सुरू असते. कारण एखादा संसर्गजन्य आजार या भागात आला तर तो झपाट्याने पसरू शकतो. त्यामुळे कायमच आमचे आरोग्य केंद्रावरील कर्मचारी झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन आरोग्याबाबत जनजागृती करत असतात. त्यामुळे गोवरच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना मुंबईतील सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये गरज पडल्यास अतिरिक्त लसीकरणाची मोहीम तसेच तेथील नागरिकांना या आजाराबाबत माहिती देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

मुंबईतील काही दाटीवाटीचा परिसर 
 ताडदेव येथील तुळशीवाडी. मालाड मालवणी - मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, धारावी, डोंगरीच्या पूर्वेकडील परिसरात येथे तर मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. 
 तर साकीनाका, काजुपाडा, जरीमरी, कमानी, बैलबाजार, पवई पोलीस ठाणे परिसर, संघर्ष नगर, असल्फा, मोहील व्हिलेज, कृष्णा नगर, पाइप लाइन रोड, लिंक रोड, क्रांती नगर, कुर्ला बेस्ट बस आगार परिसर, कपाडिया नगर, टिळक नगर, नेहरूनगर, कसाईवाडा, चुनाभट्टी आणि कुर्ला रेल्वे स्थानक येथे दाटीवाटीने वस्ती वसली आहे.

Web Title: Take measures to prevent measles infection, Chief Minister Eknath Shinde directs Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.