वीज ग्राहकांनो तुम्हीच मीटर रीडिंग घ्या; अदानी कंपनीचा नवा फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 07:57 PM2020-07-04T19:57:31+5:302020-07-04T19:58:10+5:30
पावसाळ्यात मीटर बॉक्स मध्ये पाणी साचून जोरदार झटका बसून वेळप्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई: पावसाळ्याच्या आगमनाने विद्युत अपघाताची शक्यता असून पावसाळ्यात विद्युत मीटर, विद्युत खांब, उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर्स इत्यादीपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.
पावसाळ्यात मीटर बॉक्स मध्ये पाणी साचून जोरदार झटका बसून वेळप्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र स्वतःची जबाबदारी ग्राहकांवर झटकून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने त्यांच्या सुमारे 24 लाख अधिक वीज ग्राहकांना एसएमएस पाठवून ग्राहकांना वीज मीटर रिडींग घेण्याचे फर्मान केले आहे.हे पूर्णपणे चुकीचे असून ग्राहकांवर लादलेली जबाबदारी अदानीने मागे घ्यावी,अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी कंपनी व्यवस्थापनाला केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी सुद्धा त्यांनी ईमेल द्वारे केली आहे.
अदानी कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवतांना म्हटले आहे की, बिलिंगची आपली मीटर वाचन तारीख 04.07.2020 आहे. आपण अंदाजे बिल टाळण्यासाठी आपल्या मीटरचे वाचन 04.JUL पर्यंत सबमिट करू शकता. वाचन सबमिट करण्यासाठी http://acl.cc/X75j5l9 क्लिक करा असे नमूद केेले आहे. जर मीटर रिडींग घेतांना ते जर ग्राहकांच्या जीवावर बेतले तर त्यांची संपूर्ण जबाबदारी ही कंपनीची राहिल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सदर पार्श्वभूमीच्या संदर्भात अदानी कंपनीने त्यांच्या 24 लाख अधिक ग्राहकांना मीटर रीडिंग करण्यासाठी पाठवलेला संदेश केवळ धोकादायकच नाही तर इलेक्ट्रिकल उपकरणे परिचित नसलेल्या ग्राहकांसाठी ते जीवावर बेतणारे ठरेल असे मत अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.