मुंबई - वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून किंवा मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होण्याची शक्यता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त करत मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात मोबाईल जॅमर लावावा अशी मागणी चव्हाणांनी केली आहे. यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यातील मतदान प्रक्रिया झाली आहे. मात्र, मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशिन टेम्परिंग होऊ शकते. ईव्हीएमबाबत खबरदारी घेतली पाहिजे. सर्व ईव्हीएम या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सला कुणी मोबाईल टॉवर, वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून टॅम्पर करू नये, म्हणून जॅमर बसवण्यात यावेत. तसंच प्रत्येक राउंड निकाल जाहीर केला पाहिजे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल जे वक्तव्य केले, त्याचा अशोक चव्हाण यांनी निषेध केला. तसेच पंतप्रधानांनी खालच्या पातळीवर प्रचाराचा स्तर नेल्याचा आरोप केला. भाजपाला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी लोकशाहीला घातक विधाने करत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला होता. ईव्हीएम मशिन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगत भुजबळ यांनी काहीतरी गडबड असल्याचा मला संशय वाटतो असं म्हटलं होतं.
तर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, तेलुगुदेशम पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दुसरीकडे आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ईव्हीएमवर संशय उपस्थित करत जगभरातील 191 देशांपैकी फक्त 18 देश ईव्हीएमवर निवडणुका घेत आहेत असा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते असं काही दिवसांपूर्वी सांगितले होते.