कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी आणखी आयएस अधिकारी घ्या, एकनाथ शिंदे करणार प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:59 PM2020-05-15T16:59:05+5:302020-05-15T17:00:10+5:30
ठाण्यात सुरु असलेल्या रुग्णांचे हाल बंद करावेत,अब्युलेन्सचे दर निश्चित करावेत, वेळेत रुग्णावर उपचार करावेत, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवावी तसेच कागदी घोडे नाचविणे बंद करुन तत्काळ उपाय योजना करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकाºयांना दिले.
ठाणे : दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे मुंबईत ज्या पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात पाच आयएस अधिकारी घेण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही तीन ते चार आयएस अधिकारी घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याअनुषंगाने शिंदे यांनी देखील यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले. दुसरीकडे पालिकेकडून नाचविण्यात येत असलेल्या कागदी घोड्यांच्या विरोधातही शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
शुक्रवारी कोरोनावर कशा पध्दतीने उपाय योजना करता येऊ शकतात, या संदर्भात महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर नरेश म्हस्के यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि महापालिकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी महापालिकेकडून सुरु असलेल्या ठिसाळ कारभाराचा अनेकांना पाडा वाचला. अम्ब्युलेन्स वेळेत न मिळणे हा प्रमुख विषय या बैठकीत चांगलाच गाजला. महापालिकेकडून आरटीओची परवानगी बाबत सांगण्यात आले. परंतु हे कारण अतिशय चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोरोना बाधीत रुग्णांचे सुर असलेले हाल, भाईंदर पाडा येथे क्वॉरान्टाइन करुन ठेवण्यात आलेल्यांना वेळेत सुविधा उपलब्ध न होणे, वाढत्या रुग्णसंख्येवर आळा कसा बसविता येईल, अब्युलेन्सचे वाढीव दर, खाजगी रुग्णालय आणि हॉटेलवाल्यांकडून सुरु असलेली लुट, आदी वरुन अनेक ांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महापौर नरेश म्हस्के यांनी देखील आरोग्य विभागाच्या काराभारावर ताशेरे ओढले. या सर्व मुद्यांवरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. कागदी घोडे नाचविणे बंद करुन रुग्णांना उपचार कसे लवकर मिळतील, रुग्णवाहीका तत्काळ उपलब्ध करुन द्यावात, क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अब्युलेन्सचे दर जे निश्चित केले आहेत, त्यानुसार ते घेण्यात यावेत, खाजगी रुग्णालयांची लुट बंद करा अशा सुचनाही त्यांनी केल्या. तसेच या बैठकीत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही तात्पुरत्या स्वरुपात आयएस अधिकाºयांच्या नेमणुका कराव्यात अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
दरम्यान ही बैठक झाल्यानंतर शिवसेनेच्या काही जेष्ठ नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेऊन कोरोनावर आळा घालण्यासाठी चांगल्या अधिकाºयांची फौज ठाणेकरांसाठी असावी, अशी मागणी केली. तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहरासाठी, वागळे लोकमान्य, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदींसाठी आयएस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. जेणे करुन कोरोनावर आळा घातला जाईल आणि शहरात कोरोना बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होतील आणि इतर उपाय योजना करणेही तत्काळ शक्य होईल. त्या अनुषंगाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन या नगरसेवकांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाºयांची कानउघाडणी केल्यानंतर तत्काळ महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या उपाय योजना तत्काळ अमलात आणल्या जाव्यात, तसेच रुग्णांचे हाल होणार नाहीत, याचीही खरबदारी घ्यावी अशा प्रकारे प्रत्येकाला समज दिली.