Join us

भार्इंदरच्या पाण्यासाठी मुंबईला न्यायालयात खेचू

By admin | Published: March 06, 2016 1:52 AM

मुंबई पालिकेकडून मीरा-भार्इंदर शहराला १९६७ पासून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तो तांत्रिक कारणास्तव बंद झाला.

भार्इंदर : मुंबई पालिकेकडून मीरा-भार्इंदर शहराला १९६७ पासून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तो तांत्रिक कारणास्तव बंद झाला. आता ते पाणी देण्यास मुंबई महापालिका नकार देत असल्याने या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी मुंबई पालिकेचे जलअभियंता तावडिया यांना दिला आहे.१९६७ पासून मुंबई पालिकेद्वारे मीरा-भाईंदरमधील खाजगी कंपन्या, तबेले आणि एमआयडीसीसाठी अडीच एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जात होता. पश्चिम महामार्गाखालून येणारी मुंबई पालिकेची जलवाहिनी अंदाजे ४ वर्षांपूर्वी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे फुटली. परिणामी, मुंबई पालिकेचा पाणीपुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीऐवजी नवीन जलवाहिनी टाकून ती एमआयडीसीतील टाकीसह मुंबई पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने त्या वेळी सुमारे ६० लाखांचा खर्च केला आहे. त्याच्या अनामत रकमेपोटी मीरा-भार्इंदर पालिकेने २२ लाख २० हजार मुंबई पालिकेला दिले. गेल्या वर्षी मार्चमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर मीरा-भार्इंदर पालिकेने खंडित पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी मुंबई पालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू केला. परंतु, मुंबई पालिकेने त्याला प्रतिसाद दिलेला नाही, असा आरोप पाटील यांनी केला. मीरा-भार्इंदरला हे हक्काचे अडीच एमएलडी पाणी मिळाल्यास सध्याच्या कपातीला आधार मिळण्याची शक्यता पाटील यांनी वर्तविली. त्याला मुंबई पालिकेच्या जलविभागाने मात्र स्पष्ट नकार दिल्याने याविरोधात मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असून त्यातून प्रश्न न सुटल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला.