Join us  

टेक ऑफ ‘फुल्ल’ एप्रिल..! महिनाभरात ४० हजार विमानांचे उड्डाण, आजवरचा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 5:17 AM

कोरोनाचा कराल काळ संपल्यानंतर निर्बंधांचा विळखा सैल झाला आणि सर्व व्यवहारांना आकाश मोकळे झाले.

मुंबई : कोरोनाचा कराल काळ संपल्यानंतर निर्बंधांचा विळखा सैल झाला आणि सर्व व्यवहारांना आकाश मोकळे झाले. विमान प्रवासासाठी तर ते शब्दश: खरे ठरले आहे. एप्रिल महिन्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. एप्रिल महिन्यात भारतीय अवकाशात तब्बल ४० हजार विमानांनी उड्डाण केले. कोरोना काळानंतरचा हा उच्चांक आहे. एप्रिल महिन्यातच देशात तसेच परदेशात जाणाऱ्या भारतीय विमान प्रवासी संख्येने ४ लाख ५० हजारांचा उच्चांक गाठला होता. लवकरच हा आकडा दरमहा ५ लाखांचा टप्पा सहज पार करेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतीय अवकाशातील विमान प्रवासाची रंजक आकडेवारी पुढे आली आहे.

लवकरच दरमहा किमान पाच लाख भारतीय विमानाने प्रवास करतील असा अंदाज आहे.

सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ...

दिल्लीचे विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ मानले जाते.

एकूण देशांतर्गत विमान वाहतुकीच्या ३२.८ टक्क्यांची हिस्सेदारी राखत दिल्लीने आपला अव्वल क्रमांक राखला आहे.

देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये मुंबई विमानतळाचा क्रमांक दुसरा असून त्याची हिस्सेदारी २१.७ टक्के आहे.

त्यानंतर विमान वाहतुकीच्या हिस्सेदारीत बंगळुरू (२०.७ टक्के), हैदराबाद (१३.५ टक्के) आणि कोलकाता (११.४ टक्के)  इतके आहे.