Join us

मान्सूनपूर्व सरींचा मुंबईला चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झालेली मान्सून एक्स्प्रेस थेट ईशान्य पूर्वेकडील राज्यात पोहोचली असली, तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झालेली मान्सून एक्स्प्रेस थेट ईशान्य पूर्वेकडील राज्यात पोहोचली असली, तरी मुंबईला मात्र तिने चकवा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मान्सून एक्स्प्रेसने थांबा घेतला असून, पोषक वातावरण निर्माण झाले, तर ११ जूनच्या आसपास मान्सून एक्स्प्रेस मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनचा प्रवास उत्तर पूर्व दिशेने वेगाने होत असून, देशाच्या ईशान्य पूर्वेकडील राज्यांमध्येही ताे वेगाने दाखल झाला आहे. मात्र, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह विदर्भात मान्सूनने अद्याप हजेरी लावलेली नाही. दुसरीकडे मान्सूनपूर्व सरींचा मुंबई शहर आणि उपनगरात धिंगाणा सुरू आहे. रविवारी मध्यरात्री, रविवारी पहाटे आणि रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर, दुपार आणि सायंकाळ कोरडी गेल्याचे चित्र होते. सूर्यास्ताला मुंबईच्या क्षितिजावर दाटून आलेल्या ढगांनी पावसाची वर्दी दिली खरी. मात्र, हवामान पोषक नसल्याने येथेही मान्सूनपूर्व सरींनी मुंबईला चकवा दिला.

दरम्यान, हवामान खात्याने ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परिणामी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणा, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणा, तसेच मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे.

* ...तर मान्सून एक्स्प्रेस हाेणार मुंबईत दाखल

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, सोमवारी मान्सूनच्या प्रवासात फार काही बदल झालेला नाही. मान्सूनची मुंबईकडील उत्तर सीमा अलिबाग, रायगड येथेच नोंदविण्यात आली. हा प्रवास पुढे सरकला तर ११ जूनच्या आसपास मान्सून एक्स्प्रेस मुंबईत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

--------------------------