मुंबई : जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी ठोस भूमिका तुम्ही घेत नसल्याने तुमच्याबद्दल शंका येते, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आपल्याच पक्षाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना घरचा अहेर दिला.सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील निवकणे सिंचन प्रकल्पाच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न शिवसेनेचे शंभुराजे देसाई यांनी उपस्थित केला होता. मान्यता न घेताच या प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम करण्यात आले आणि त्यासाठी ४ कोटी रुपये खर्चही करण्यात आल्याचा आरोप देसाई यांनी केला. या कामात गैरव्यवहार झाला नाही. प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी माती समतल करण्याचे काम करण्यात आले, असे सांगण्याचा प्रयत्न राज्यमंत्री शिवतारे यांनी केला; पण त्यावर सत्तापक्षाच्याही सदस्यांचे समाधान होत नव्हते. दोषी अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा, जलसंपदा खात्यातील गैरव्यहारांबाबत नेमकी भूमिका घ्या नाही तर आम्हाला तुमच्या हेतूविषयी शंका येईल, असे आबिटकर यांनी सुनावले. निवकणे प्रकल्पाच्या गैरव्यवहाराची चौकशीशंभुराजे देसाई, प्रकाश आबिटकर यांनी आग्रही मागणी केल्यानंतर निवकणे प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराची चौकशी दक्षता पथकामार्फत एक महिन्याच्या आत करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
भूमिका घ्या, नाही तर तुमच्याबद्दलही शंका
By admin | Published: March 27, 2015 1:18 AM