विद्यार्थ्यांनी मांडले मत; आतापर्यंत ६५ टक्क्यांहून अधिक जणांची परीक्षेला संमती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीसाठी स्वतंत्र सीईटी घ्यावी की नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून करण्यात येणाऱ्या चाचपणीत स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. यासंदर्भात रविवारपर्यंत विद्यार्थ्यांनी नाेंदविलेल्या एकूण मतांपैकी ६५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी संमती दर्शविली. यामध्ये राज्यातून सर्वाधिक मते ही मुंबईतून ५८,२५० एवढी नाेंदविली गेली. त्यानंतर अनुक्रमे ठाणे, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा नंबर लागताे. आतापर्यंत १ लाख ७९ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली.
परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे, याबाबतच्या उपायांची चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात विद्यार्थी, पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात येत असून, साेमवारी विद्यार्थ्यांना मते नोंदविण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. यानंतर अकरावी प्रवेशासाठी नेमकी कोणती प्रक्रिया राबवावी, यावर शिक्षण विभागाकडून निर्णयाची अपेक्षा आहे. सर्वेक्षणात रविवारी रात्रीपर्यंत एकूण २ लाख ७३ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी मते नोंदविली. त्यापैकी २ लाख ५३ हजार ४७१ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे, ८ हजार २५४ विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे, तर ५२५४ विद्यार्थी आयसीएसई, ३४२ आयजी मंडळाचे आहेत.
सर्वेक्षणात एकूण १ लाख ७९ हजार ६५८ म्हणजेच ६५.५८ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेला संमती दर्शवली, तर ९४ हजार २८६ म्हणजेच ३४.२४ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटी नकाे, असे मत मांडले.
* अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळाही तयार
दहावीसाठी अंतर्गत मूल्यमापन करणे शाळांना शक्य आहे की नाही, याबाबतही शालेय शिक्षण विभाग सर्वेक्षणाअंती शाळेचे मत जाणून घेत आहे. रविवारी रात्रीपर्यंत १५ हजार ९२६ शाळांनी म्हणजेच ८३ टक्के शाळांनी मूल्यमापनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, तर सुमारे १६ टक्के शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाची तयारी नसल्याचे नमूद केले.
* इतर प्रवेशांचे काय?
अकरावीचे प्रवेश हे शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतच होत असले तरी त्याशिवाय अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक), तंत्रनिकेतन (आयटीआय) यांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण, कौशल्य विकास विभागांच्या अखत्यारीत होते. या दोन्ही अभ्यासक्रमांना मिळून जवळपास साडेतीन ते चार लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असली तरी या प्रवेश प्रक्रियांसाठी निकष काय असणार, या प्रवेशांसाठी इतर स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार का, त्यासाठी गुणांचे मूल्यमापन कसे असणार, यासारखे अनेक प्रश्न शिक्षण विभागाकडून अद्याप अनुत्तरित आहेत.
.............................