Join us

कुणी प्रसाद घ्या, कुणी अ‘शोक’ घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:28 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक उमेदवार यादीत मोहन जोशी यांच्या नावावर अपात्रतेचा शिक्का बसल्यावर अनेकांना धक्का बसला. २०१३च्या नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या पॅनल्सनी निवडणुकीचे रणांगण गाजविले होते.

राज चिंचणकर मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक उमेदवार यादीत मोहन जोशी यांच्या नावावर अपात्रतेचा शिक्का बसल्यावर अनेकांना धक्का बसला. २०१३च्या नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या पॅनल्सनी निवडणुकीचे रणांगण गाजविले होते. यंदाच्या निवडणुकीत मोहन जोशी आणि प्रसाद कांबळी यांच्या पॅनल्समध्ये घमासान होण्याची चर्चा नाट्य वर्तुळात होती, पण मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरल्याने, त्यावर ‘पडदा’ पडला आहे. मोहन जोशी यांचा अर्ज बाद होण्यामागे अशोक शिंदे यांची ‘भूमिका’ महत्त्वाची ठरली आहे.अशोक शिंदे यांचे नाव अंतिम मतदार यादीत नसल्याने व ते नाट्य परिषदेचे सदस्य नसल्याने, ते मोहन जोशी यांच्या अर्जाला नियमानुसार सूचक म्हणून पात्र ठरू शकले नाहीत. याच कारणामुळे स्वत: अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्जही निकालात निघाला आहे. तुषार दळवी आणि सुनील तावडे यांच्याबाबतीतही अगदी हेच घडल्याने, त्यांनाही ‘शोक’ अनावर झाल्याची चर्चा आहे.मोहन जोशी व प्रसाद कांबळी हे नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार समजले जात होते, पण मोहन जोशी यांना निवडणुकीतून नारळ मिळाल्याने, प्रसाद कांबळी यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. मोहन जोशी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या उमेदवारी भोवतीचे वलयही विस्तृत झाले आहे.दरम्यान, अशोक शिंदे हे नाट्य परिषदेचे सदस्य नसल्याचा साक्षात्कार, मोहन जोशी, तुषार दळवी व सुनील तावडे यांना आधी झाला नाही का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. उमेदवारी अर्ज भरताना ही बाब या ज्येष्ठ मंडळींच्या लक्षात येऊ नये, यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामागे काही वेगळा ‘प्रयोग’ तर नाही ना, अशी शंकाही नाट्यवर्तुळात वर्तविली जात आहे.प्रतीक्षा अंतिम यादीचीसध्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून, नावे मागे घेण्याची मुदत अजून बाकी आहे. शनिवार, २७ जानेवारी रोजी उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरच या वेळचे नाट्य परिषदेचे रणांगण कोण गाजविणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :मोहन जोशी