मुंबई : बऱ्याचदा लहानग्यांच्या बाबतीत खेळताना वा चुकून घडलेली अपघाताची प्रकरणे समोर येतात. त्यात मग सेफ्टी पिन गिळणे, नाणे अडकणे, इअर बर्ड मुळे कानाला इजा होणे अशा विविध समस्या समोर येतात. शहर उपनगरातील पालिका रुग्णालयात महिनाभरातून ३ ते ४ प्रकरणे समोर येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
लहानग्यांसोबत अशा घटना घडल्यास बऱ्याचदा पालक घरगुती उपाय करण्यावर भर देतात. तसे न करता अशा स्थितीत प्रथमतः वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण लहानग्यांचे प्रकृती स्वास्थ नाजूक असते. अशा वेळेस घरगुती उपाय वा कोणी सांगितलेले – ऐकलेले उपाय लहानग्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकतात, अशी माहिती कान-नाक-घसा विकारतज्ज्ञ डॉ. किशोर साळवे यांनी दिली आहे.
अशावेळी काय करू नये?
मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.
वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रीतीने काढू शकतात.
नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका. स्पष्टीकरणः शिंक येण्यापूर्वी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते.
नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सीताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.
नाक, कान व घशात अडकलेली वस्तू घरी काढण्याचा प्रयत्न करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.
महिनाभरात ३ ते ४ शस्त्रक्रिया
लहान मुलांच्या बाबतीत अशा स्वरूपाची निर्माण होणारी गुंतागुंतीची प्रकरणे पालिका रुग्णालयात महिनाभरातून तीन ते चार वेळा नोंदविली जातात. मात्र बऱ्याचदा ही प्रकरणे आपत्कालीन विभागात किंवा काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र याविषयी पालकांनी सजगता बाळगावी, लहानग्यांकडे लक्ष ठेवावे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
हे लक्षात ठेवा
लहान मुलांच्या कान-नाक-घशात कुठलीही वस्तू टाकून मळ काढू नये. इअर बडदेखील टाकू नये, कानातला मळ हा निसर्गाने कानाच्या सुरक्षेसाठी तयार केलेली वस्तू आहे.
लहान बाळांचे नाकसुद्धा स्वच्छ करण्याची चेष्टा करू नये.
लहान बाळांच्या काना-नाकात तेल टाकू नये, त्यामुळे बुरशी येऊन जंतूसंसर्ग होऊ शकतो. लहान मुलांच्या कानात कुठलेच इअर फोन्स लावू नये.
पाच वर्षांपर्यतच्या लहान मुलांना काजू, बदाम, शेंगदाणे, फुटाणे या सारखे पदार्थ बारीक केल्याशिवाय खायला देऊ नये. अनेक वेळा त्याचा एखादा तुकडा श्वासनलिकेत अडकू शकतो.