Join us

शैक्षणिक संस्थांमधील जातीयवाद बंद करण्यासाठी पावले उचलावीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:25 AM

जन आरोग्य अभियान : पायलच्या जीवघेण्या भेदभावाचा निषेध

मुंबई : आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी अनेक सामाजिक अडथळे पार करून डॉक्टर झाली. तिने पदव्युत्तर प्रवेश घेतला. मात्र तिला हेटाळणीची वागणूक मिळाली, तिला दूषणे दिली. त्यामुळे तिने रुग्णालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई व्हावी आणि वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमधील जातीयवाद तातडीने बंद होण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानकडून करण्यात येत आहे.

या प्रकाराला रॅगिंगचे नाव देऊन जातीय भेदभावाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नाचाही निषेध करण्यात आला. आता त्या तीन डॉक्टरांवर रॅगिंगविरोधी कायदा, सोबत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, आयटी कायदा यांच्या अंतर्गत खटला दाखल झाला आहे. त्यात हयगय करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक, आर्थिक परिस्थितीने उभे केलेले अडथळे पार करून थोड्या प्रमाणावर आदिवासी, दलित, मुस्लीम, इतर वंचित समाजातील विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचतात, तिथेही त्यांना संघर्ष करावा लागतो. कित्येक आदिवासी, दलित विद्यार्थी हे अशा भेदभावाला, दूषणांना सामोरे जातात. त्यातील काही जण तर शिक्षण सोडतात. त्यामुळे डॉ. पायल यांच्या कुटुंबासोबत न्याय व्हावा. तसेच वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेल्या अशा भेदभावांची व्यापक चौकशी व्हावी.

शिवाय याबाबत वैद्यकीय विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांना भविष्यात भेदभावाची वागणूक मिळू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वत:हून पावले टाकणे गरजेचे असल्याचे जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.