देशभरात तब्बल ६८ टक्के दुधात भेसळ होत असल्याचा खुलासा मोहनसिंग अहुवालीया यांनी केला आहे. अहुवालिया केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी या प्रश्नावर वारंवार आवाज उठविला आहे. आता सरकारी यंत्रणेतील अधिका-यांनीही दुधात भेसळ होत असल्याचे स्पष्ट केले आहे. दुधात होत असलेल्या या भेसळीमुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना बळी पडतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. आता या पार्श्वभूमीवर तरी सरकारी यंत्रणेने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
राज्यात संघटीत व असंघटीत क्षेत्रात मिळून सरासरी प्रतिदिन २ कोटी ८० लाख लिटर दुधाचे वितरण होते. दुधाचे शेतक-यांकडून होणारे संकलन मात्र यापेक्षा कमी आहे. परराज्यातून येणारे दुध जमेस धरले तरी उत्पादन व आवक यापेक्षा वितरण अधिक होत आहे. केमिकल वापरून तयार केलेल्या लाखो लिटर बोगस दुधाची भर पडल्यानेच उत्पादनापेक्षा वितरण अधिक होताना दिसते आहे. पाणी, पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, अमोनियम, मीठ, न्युट्रीलायजर, हायड्रोजन पेरॉक्साईड, डीटर्जंट पावडर यासारख्या पदार्थांचा वापर करून लाखो लिटर भेसळीचे दुध राज्यात तयार होत आहे.
कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीमुळे या म्हणण्याला वारंवार दुजोरा मिळाला आहे. दुध महापुराचे इंगित भेसळीच्या या लाखो लिटर दुधात दडलेले आहे. दुध उत्पादकांना यामुळेच त्यांच्या दुधाला अत्यल्प भाव मिळतो आहे. ग्राहकांनाही या भेसळीमुळे निकृष्ट व आरोग्यास अत्यंत घातक दूध विकत घ्यावे लागत आहे. दुधातील ही भेसळ रोखण्यासाठी भेसळ शोधणा-या ‘मिल्क स्ट्रीप’ चा वापर मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. दुधाचे उत्पादन, आवक व वितरण याचा अचूक ताळमेळ लावणारी यंत्रणाही निर्माण करणे आवश्यक आहे.
अन्न व औषधी प्रशासन आणि नगर पालिकांकडे भेसळ शोधण्याची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र प्रशिक्षित मन्युष्य बळ उपलब्ध नसल्याने भेसळ विरोधी पथके नसल्यात जमा आहेत. परिणामी भेसळीचा महापूर सुरु आहे. शेतकरी व ग्राहकांच्या आरोग्याशी सुरु असणारा हा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी सरकारने आता तरी गंभीर होत भेसळी विरोधात कठोर पावले उचलावीत अशी मागणी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.