Join us

परीक्षा द्या आणि रीतसर काम करा; रिअल इस्टेट एजंट्सची ६ ऑगस्टला परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 2:44 PM

२० मे रोजी झालेली पहिली परीक्षा ४२३ एजंट्सनी दिली होती. यापैकी ४०५ एजंट्स उत्तीर्ण झाले होते.

मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील ३,१३७ एजंट्स अपेक्षित प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून ६ ऑगस्टला राज्यात होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात पंढरपूर, लातूर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूरसह पुणे, मुंबई महानगरातील एजंट्स सहभागी होणार आहेत. २० मे रोजी झालेली पहिली परीक्षा ४२३ एजंट्सनी दिली होती. यापैकी ४०५ एजंट्स उत्तीर्ण झाले होते.

रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंट्सच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंट्सचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंट्सना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहिती असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणीपत्र, चटई क्षेत्र, दोष, दायित्व कालावधी यासारख्या तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

-     राज्यात सुमारे ३९ हजार रिअल इस्टेट एजंट्स कार्यरत आहेत.-     १ सप्टेंबरपूर्वी त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.-     महारेराने ही बाब १० जानेवारीला परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.-     सर्वांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नाहीतर १ सप्टेंबरनंतर त्यांना एजंट म्हणून काम करता येणार नाही. 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगपरीक्षा