यंदाच्या पावसाळ्यात मिलन सबवेतून जा बिनधास्त; यंदा पावसाळ्यात सांताक्रुझकरांना मिळणार मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 11:02 AM2023-05-22T11:02:12+5:302023-05-22T11:02:30+5:30
जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्यापासून मिलन सबवेला दिलासा देण्यासाठी साठवण जलाशयाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सांताक्रूझ येथील मिलन भुयारी मार्ग (सबवे) येथे जोरदार पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत मिलन सबवे जवळच्या लायन्स क्लब मैदानात साठवण जलाशय बांधण्यात येत आहे. गेल्या वर्षी ८ एप्रिल २०२२ पासून या जलाशयाचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी सुमारे ४१ कोटी खर्च अपेक्षित आहे.
जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्यापासून मिलन सबवेला दिलासा देण्यासाठी साठवण जलाशयाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित ५ टक्के काम वेळेत पूर्ण होणार आहे. जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करून ते या जलाशयांमध्ये साठवले जाणार आहे. याच स्वरूपाची उपाययोजना मिलन सबवेतही केली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात मिलन सब वेची होणारी तुंबई रोखली जाणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ परिसरातील नागरिकांना यंदा पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या शुक्रवारी १९ रोजी पश्चिम उपनगरांतील नाल्यांच्या कामाची तसेच मिलन सब वेच्या कामाचीही पाहणी केली होती. त्यावेळी आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी प्रशासन करत असलेल्या उपायांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
दोन पंपही करणार तैनात
मिलन सबवे येथील साठवण जलाशय हे सुमारे २ कोटी लिटर क्षमतेचे आहे. मिलन सबवे परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास त्याचा उपसा करून या जलाशयात साठवले जाईल.
त्यासाठी ३ हजार घनमीटर प्रतितास क्षमतेचे एकूण दोन उदंचन पंप कार्यान्वित केले जातील. म्हणजेच प्रतितास ६ हजार घनमीटर या क्षमतेने पाण्याचा उपसा होऊ शकेल.
७० बाय ५५ मीटर आकाराच्या या जलाशयाची खोली सुमारे १०.५ मीटर असेल, तर येत्या पावसाळ्यात ताशी ३० लाख लिटर पाण्याचा उपसा करणारे दोन पंपही तैनात करण्यात येतील, अशी माहिती महाले यांनी दिली.