नेहरू तारांगणहून भुयारातून जा नेहरू सेंटरला; पालिका करणार ३५० कोटी खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:01 AM2022-12-05T06:01:24+5:302022-12-05T06:01:34+5:30

हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनू नये म्हणून नेहरू तारांगण ते नेहरू विज्ञान केंद्र याठिकाणी शालेय मुलांसह इतरांना सुलभरीत्या रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

Take the subway from Nehru Planetarium to Nehru Centre; 350 crore will be spent by the municipality | नेहरू तारांगणहून भुयारातून जा नेहरू सेंटरला; पालिका करणार ३५० कोटी खर्च 

नेहरू तारांगणहून भुयारातून जा नेहरू सेंटरला; पालिका करणार ३५० कोटी खर्च 

googlenewsNext

मुंबई : दक्षिण मुंबईतील वरळी येथे नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्र असून, या ठिकाणी अभ्यासानिमित्त शाळेच्या सहली येत असतात. याशिवाय खगोलशास्त्र आणि विज्ञानाची माहिती घेण्यासाठी मुंबईकरही या ठिकाणी  नियमित भेट देत असतात. मात्र, येथे येणाऱ्या मुलांना रस्ता ओलांडावा लागतो, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, हे टाळण्यासाठीच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पालिका या ठिकाणी भुयारीमार्ग बांधणार आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळीतील मरिअम्मानगर आणि नेहरू विज्ञान केंद्र यामधून विकास नियोजन आराखड्यातील १८.३ मीटर रुंदीचा आरक्षित रस्ता असून, हा रस्ता डॉ. ॲनी बेझंट रोड व डॉ. ई मोझेस रोड यांना जोडणारा आहे. या रस्त्यांची सुधारणा महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या रस्त्यांची सुधारणा करताना नेहरू विज्ञान केंद्रात येणाऱ्या मुलांना रस्ता ओलांडताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनू नये म्हणून नेहरू तारांगण ते नेहरू विज्ञान केंद्र याठिकाणी शालेय मुलांसह इतरांना सुलभरीत्या रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतील वरळी येथील ई मोजेस रोड ते डॉ. ॲनी बेझंट रोडपर्यंतच्या नेहरू विज्ञान केंद्राला जोडून असलेल्या नाल्यावर वाहतुकीसाठी पूल बांधण्यात येणार आहे. आरपीएस इन्फ्रा या कंपनीला  या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.

वाहतूक कोंडी टळणार 
विकास नियोजन आराखड्यातील प्रस्तावित डीपी रोडची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यावर पुलाची उभारणी करणे आवश्यक असून, या पुलावरून वाहतूक वळवल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Take the subway from Nehru Planetarium to Nehru Centre; 350 crore will be spent by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.