तिवरांवर टाकलेला कचरा उचला
By admin | Published: August 5, 2015 01:50 AM2015-08-05T01:50:53+5:302015-08-05T01:50:53+5:30
नवी मुंबईतील तिवरांवर टाकलेला कचरा उचला व जेथे तिवरे नष्ट झाली असतील, त्या ठिकाणी त्याची पुन्हा लागवड करा, असे आदेश उच्च न्यायालयाने
मुंबई : नवी मुंबईतील तिवरांवर टाकलेला कचरा उचला व जेथे तिवरे नष्ट झाली असतील, त्या ठिकाणी त्याची पुन्हा लागवड करा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबई, सिडको व वन विभागाला दिले.
या प्रकरणी विनोद पुन्शी यांनी जनहित याचिका केली आहे. नवी मुंबईतील तिवरांवर कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे तिवरे नष्ट होत असून, तिवरांच्या रक्षणासाठी न्यायालयाने येथील प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात तिवरांवरील कचरा उचलण्यावरून नवी मुंबई पालिका, सिडको व वन विभाग यांच्यात कार्यक्षेत्रावरून वाद सुरू होता. त्यावर खंडपीठाने तोडगा काढला. ज्यांच्या कार्यक्षेत्रात तिवरांवर कचरा असेल त्यांनी तो उचलावा. त्यातूनही कार्यक्षेत्राचा वाद झाल्यास कोकण विभाग आयुक्तांच्या अध्यक्षतेतखाली समिती नेमून यावर तोडगा काढावा. तसेच कचरा टाकल्यामुळे जेथे तिवरे नष्ट झाली असतील, त्या ठिकाणी तिवरांची पुन्हा लागवड करावी. तिवरांवर कचरा टाकला जात असल्यास नागरिकांना त्याची तक्रार करता यावी, यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी, असे आदेश खंडपीठाने दिले
आहेत. (प्रतिनिधी)