आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घ्या!- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:21 AM2019-01-24T05:21:49+5:302019-01-24T05:22:02+5:30
‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
मुंबई : ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. लाटेमुळे नव्हे, तर हॅकिंग करून २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचा आरोप भारतीय सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याने केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या मतपत्रिकेद्वारेच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केली.
जगभर ईव्हीएम नाकारले जात आहे. सर्व मोठ्या देशांमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान होते. ईव्हीएम मशीनवर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींत मतपत्रिकांचाच वापर करावा, या मागणीचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना दिले. या वेळी निरुपम म्हणाले, २०१४ साली मोदी लाट वगैरे काहीच नव्हती. हॅकिंग करूनच ते पंतप्रधान झाले. त्यासाठी १४-१५ हॅकरना कोट्यवधींची लाच देण्यात आली. हॅकिंगने विजय मिळविणाऱ्या नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.
मतदान हा सामान्य जनतेचा मूलभूत अधिकार आहे. परंतु ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकणे हा लोकशाहीचा, संविधानाचा अपमान आहे. सत्तेत येण्यासाठी ज्या हॅकरचा उपयोग करण्यात आला, पुढे त्याचीच हत्या करण्यात आली. हे सारे प्रकरण माहीत झाल्यामुळे भाजपाचेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचीही हत्या करण्यात आली. हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. या सर्व प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचीही मागणी निरुपम यांनी केली.