Join us

"आम्हाला पदरात घ्या, परतीसाठी अनेकांचे फोन, पण..."; संजय राऊतांचा असाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 3:50 PM

भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या खासदारीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला

मुंबई - शिवसेना फुटीनंतर दोन पक्ष झाले अन् नेते, पदाधिकारी विभागले गेले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत १३ खासदार आणि ४० पेक्षा जास्त आमदार आल्याने शिंदेंची ताकद वाढली. त्यातच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने शिंदेच्या शिवसेनेत अनेकांचे प्रवेश झाले. मात्र, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता त्याच नेत्यांचे तिकीट कापले जात असल्याने काहींनी संताप व्यक्त करत बंडखोरीची भाषा बोलून दाखवली. तर, दुसरीडे शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. त्यात, आणखी नेते परत येतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या खासदारीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. जळगाव लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांना भाजपाने तिकीट दिलं नाही. त्यामुळे, नाराज झालेल्या खासदारांनी थेट भाजपाला जय श्रीराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहेत. हेमंत पाटील आणि भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याने भावना गवळी यांनीही बंडखोरीची भाषा केली आहे. तर, नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसेही आग्रही आहेत. त्यातच, आता संजय राऊत यांनी शिवसेनेतील अनेक नेते परतीसाठी इच्छुक असल्याचा दावा केला आहे. 

आम्हाला पदरात घ्या, असे म्हणत अनेक नेत्यांनी परतीसाठी फोन केल्याचा दावा संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. मात्र, गद्दारांना आता शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्हाला तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं चालेल. तुमच्या गैरहजेरीत ज्यांनी हा पक्ष टिकवला, वाढवला, स्वाभिमानाने लढले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जे तुरुंगात गेले, त्यांना आम्ही काय उत्तर देणार, असे म्हणत गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

हेमंत गोडसेंना स्थान नाही

शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न मिळालेल्या खासदारांना शिवसेनेत प्रवेश देणार का, हेमंत गोडसेंना पक्षात घेणार का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारण्यात आला होता. त्यावर, हेमंत गोडसे कोण आहेत, कुठले खासदार आहेत. त्यांना आम्ही निवडून दिले आहे. आमच्याकडून कोणत्याही गद्दांरासाठी दरवाजे उघडे नाहीत. जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले, तर हा निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिकांचा अपमान आहे, अशा शब्दांत गोडसेंना मातोश्रीचे दरवाजे उघडे नाहीत, असे राऊतांनी यापूर्वीच म्हटले आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४