पाणीकपात तातडीने मागे घ्या
By admin | Published: September 24, 2015 02:19 AM2015-09-24T02:19:38+5:302015-09-24T02:19:38+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात मागे घेण्यात यावी, अशा आशायाचे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशोधर
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात मागे घेण्यात यावी, अशा आशायाचे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना बुधवारी दिले आहे. परिणामी, आता या पत्रावर आयुक्त नक्की काय भूमिका घेतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात अध्यक्ष म्हणतात, की या वर्षी पावसाच्या मोसमामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाण्याच्या साठ्यापेक्षा ३०% कमी पाणीसाठा उपलब्ध होता. या कारणास्तव महापालिकेने मुंबईत २०% पाणीकपात केली होती. त्यामुळे अनेक विभागांत रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. मात्र गेल्या काही दिवसांत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे.
त्यामुळे तलाव क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीकपात तातडीने मागे घेण्यात यावी. दरम्यान, पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी सातही तलावांत १ आॅक्टोबर रोजी एकूण १४ लाख दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे. आणि २३ सप्टेंबर रोजी सात तलावांत एकूण ११ लाख ३९ हजार ६३५ दशलक्ष लिटर्स जलसाठ्याची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लिटर्स जरी झाला तरी २० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी समिती अध्यक्षांनी आयुक्तांना पाणीकपात मागे घेण्याबाबत पत्र लिहिले असले, तरीही १ आॅक्टोबरनंतरच पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची सध्यातरी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
तलाव आजची पातळी खोली
मोडक १६३.१११६३.१५
तानसा१२८.०८१२८.६३
विहार७७.२१८०.१२
तुळशी१३९.२११३९.१७
अ. वैतरणा६००.५२६०३.५१
भातसा१३४.८११४२.०७
म. वैतरणा २८४.८७२८५
(आकडेवारी मीटरमध्ये)