ताप आला, स्वतःच अँटिबायोटिक सलाईन लावले; डॉक्टरचा मृत्यू; हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:13 AM2024-03-05T08:13:11+5:302024-03-05T08:13:54+5:30
रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वतःच अँटिबायोटिकचे सलाईन लावल्याने रिॲक्शन आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातील (सायन रुग्णालय) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा (जनरल सर्जरी) विषयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरचा हॉस्टेलच्या खोलीत गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वतःच अँटिबायोटिकचे सलाईन लावल्याने रिॲक्शन आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. सौरभ धुमाळ असे या दुर्दैवी निवासी डॉक्टरांचे नाव असून ते परभणी जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी डॉ. धुमाळ खूप वेळ त्यांच्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला, तेव्हा ते खोलीत मृतावस्थेत आढळले. बेडवर सलाईनही आढळले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. धुमाळ होस्टेलच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. विशेष म्हणजे इतर मुले जर काही मानसिक तणावाखाली असतील तर त्यांचे ते समुपदेशन करत. काही दिवसांपूर्वीच ते १० दिवसांची रजा घेऊन परतले होते. मात्र, ताप आल्याने त्यांनी हॉस्टेलवरच उपचार घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अँटिबायोटिकचे सलाईन घेत होते.
डॉ. धुमाळ अतिशय गुणी विद्यार्थी होते. इतर विद्यार्थ्यांना ते सहकार्य करायचे. त्यांच्या शरीरावर रॅश आल्याचे दिसून आले होते. औषधाचे दुष्परिणाम झाल्यावर रॅश येतात. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. सायन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय