मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. किंबहुना प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठीच हा प्रयत्न करण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.७ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत दर आठवड्यात मंगळवार, गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस धावपट्टी दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तासांसाठी धावपट्टीचा वापर पूर्णत: बंद करण्यात आला होता. याचा फटका विमान प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला. अनेक विमान कंपन्यांना त्यांच्या विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली तर अनेक विमानांचे मुंबईतील लँडिंग रद्द करण्यात आले.मुंबई विमानतळावरून दररोज २४ तासांमध्ये सरासरी ९५० विमानांची वाहतूक होते. त्यामुळे या कालावधीत झालेल्या दुरुस्ती कामाचा फटका काम सुरू असलेल्या प्रत्येक दिवशी साधारण २३० विमानांना बसला. या कालावधीत अनेक देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांच्या मार्गात व वेळेत गरजेनुसार बदल करण्यात आले. त्याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक मार्गांवरील विमान प्रवास तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत महागला होता.विमान वाहतूक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनादेखील कामाच्या वेळा बदलाव्या लागल्याने तसेच त्यांना अनेक सुविधा पुरवाव्या लागल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड कंपन्यांना सहन करावा लागला. या कालावधीत तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना परतावा तसेच शक्य त्या वेळी पर्यायी विमानात जागा करून देण्यात आली.दुरुस्तीचे काम लवकरच पूर्णत्वास येणार असून शनिवारपासून धावपट्टी पुन्हा सुरु होईल, असे विमानतळ प्रशासनाने सांंगितले.वेळेआधीच करण्यात आले काम पूर्णछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम ३० मार्चपर्यंत चालणार होते. मात्र त्यापूर्वीच हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असून शनिवारी ३० मार्चपासून धावपट्टीचा पूर्ण वापर केला जाईल, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विमानांचे टेकऑफ शनिवारपासून पूर्ववत; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:06 AM