डिपॉझिटवर फ्लॅट घेताय? तर सावधान...फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:45 PM2024-03-22T15:45:13+5:302024-03-22T15:45:35+5:30
उत्तर विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तुम्हीही अशा प्रकारे घरासंबंधित व्यवहार करण्यापूर्वी योग्य शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई :
घर खरेदी - विक्री तसेच भाडे तत्त्वावर देण्याबाबत नामांकित वेबसाईटद्वारे इस्टेट एजंट असल्याची जाहिरात करून लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तुम्हीही अशा प्रकारे घरासंबंधित व्यवहार करण्यापूर्वी योग्य शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मीरा रोड परिसरात हेवी डिपॉझिटवर फ्लॅट या ‘ग्लोबल्स होम बेस्ट सर्विस’ची जाहिरात पाहून त्यामध्ये इस्टेट एजंटच्या दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. यातील आरोपी व त्याचे साथीदार यांनी तक्रारदार यांना ते इस्टेट एजंट आहेत असे भासवून मीरा रोड, वसई, नालासोपारा परिसरातील वेगवेगळ्या फ्लॅटचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवून जाळ्यात ओढले.
...तर व्यवहार करताना काळजी घ्या
नागरिकांनी अशा फसव्या ऑनलाइन जाहिरातींना बळी पडू नये. पडताळणी न करता कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. हेवी डिपॉझिटवर व्यवहार करताना संबंधित प्रॉपर्टीची शहानिशा करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
तांत्रिक तपासात गुन्ह्यातील आरोपी हे नालासोपारा, वसई परिसरात आपला ठावठिकाणा बदलून ओळख लपवून राहत असल्याचे स्पष्ट होताच पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत हौशिला ऊर्फ शिवा शिवकुमार शुक्ला (वय २७), योगेश दुलेराय करवट (वय ५५) आणि विशाल राजनाथ यादव (वय २९) यांना अटक केली.
इस्टेट एजंट, घर मालक असल्याचा बनाव करून त्यांनी नामांकित वेबसाईटवर जाहिरात देऊन नागरिकांशी संपर्क केला. सावज जाळ्यात येताच घर, फ्लॅट खरेदी, विक्री, भाडेतत्त्व व्यवहाराच्या बहाण्याने विविध बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडून लाखो रुपयांना गंडविले.
हेवी डिपॉझिटसाठी व्यवहाराची रक्कम विविध बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले. गुन्ह्यातील सायबर आरोपीतांनी स्वतः फ्लॅटचे मालक, भाडेकरू असल्याचा बनाव करून ही रक्कम स्वतःच्या व इतरांच्या नावे असलेल्या बँक खात्यावर स्वीकारून तक्रारदार यांची २२ लाख ३१ हजारांना फसवणूक केली.