मुंबई: लॉकडाऊनचा फायदा घेत मालाडमधील पालिकेच्या हिंदी शाळेत जवळपास दिड लाख रुपये किंमतीचे संगणक लंपास करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या 'ऑनलाइन' शिक्षणात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेत कुरार पोलिसांनी वेगाने तपास करत तीन आरोपींच्या मुसक्या शुक्रवारी आवळत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले.
हितेश सोलंकी (२८) , शेखर सावंत (३८) आणि अंकिता जाधव (२२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ९ डिसेंबर, २०२० रोजी कुरार मनपा शाळा क्रमांक २ चे इंचार्ज राजेशकुमार सिंग (५३) यांनी कुरार पोलिसात तक्रार करत संगणक आणि सिपीयू मिळून १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार दिली. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ डी एस स्वामी आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जी घार्गे आणि पोलीस उपनिरीक्षक धनेश सातार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास करत शाळेचा सुरक्षारक्षक सावंत याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यात त्याना अन्य दोघांची नावे समजली. अंकिता आणि हितेश या दोघांमध्ये प्रेम संबंध असून मौजमजा करण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली. सावंतच्या मदतीने त्यांनी दोन ते तीन दिवसात रिक्षाने ही चोरी केल्याचेही समोर आले आहे.