एसटी प्रवासात सवलत घेताय? मग आधी आसन क्रमांक तपासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 08:46 AM2023-12-25T08:46:04+5:302023-12-25T08:46:40+5:30
प्रवाशांच्या तक्रारींची दखल, सर्व विभाग नियंत्रकांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एसटीच्या राखीव आसनांबाबत संभ्रम निर्माण होत असून, प्रवाशांकडून महामंडळाकडे तक्रारी होत आहेत. या तक्रारींची दखल घेत महामंडळाने नववर्षापासून विविध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि सवलतधारी प्रवाशांसाठी राखीव आसनांमध्ये बदल केला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आदींना प्रवासभाड्यात सवलत दिलेली आहे. या सेवाप्रकारांमध्ये विविध आसनक्षमतेच्या बसेस उपलब्ध आहेत. आता महामंडळाने एटीआयएम- ओआरएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या प्रणालीत वेगवेगळे सीट लेआऊट उपलब्ध आहेत, तसेच बसप्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना आसन क्रमांकही वेगवेगळे उपलब्ध आहेत.
त्यामुळे राखीव आसनांबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने या प्रवाशांच्या राखीव आसनव्यवस्थेत बदल करण्यात आला असून, १ जानेवारी २०२४ पासून आसनव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महामंडळाने सर्व विभागीय नियंत्रकांना दिल्या आहेत.