Join us

स्टिरॉइड घेणं पडलं जीवघेणं; शरीरसौष्ठव स्पर्धेदिवशीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 6:21 PM

उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देमृत नावेद मुंब्रा येथील असरफ कंपाउंडमध्ये राहत होता. नावेदचे जिम ट्रेनर बनण्याचे स्वप्न मात्र त्याच्या अकाली निधनाने अपुरे राहिले. फुफ्फुस खराब झाल्याने त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला.

मुंबई - बॉडी बिल्ड करण्यासाठी स्टिरॉईड घेणं एका तरूणासाठी जीवघेणं ठरलं आहे. स्टिरॉईडचं अतिसेवन केल्याने नावेद जमील खान (२३) या तरूणाचं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत नावेद मुंब्रा येथील असरफ कंपाउंडमध्ये राहत होता. ठाण्यात होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तो सहभागी होणार होता. त्याच दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.नावेदला शुक्रवारी रात्री ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर त्याला बिलाल रुग्णालयात नेण्यास सांगितले.  बिलाल रुग्णालयात काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमधून नावेदला हिपॅटायटीस - बी (Hepatitis - B) हा आजार झाल्याचं निष्पन्न आलं. त्याच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही अधिक असल्याचं वैद्यकीय तपासात उघड झालं. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील स्टिरॉइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लुकोकॉट्रीकॉइड्स यामुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.

नावेदची त्वचा पिवळी पडून त्याच्या पोटात काहीच अन्न राहत नव्हते. म्हणून त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. त्याचे यकृत प्रत्यारोपण करणार असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. कुटुंबाने नावेदला केईएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोवर त्याची प्रकृती खूप खालावली होती. फुफ्फुस खराब झाल्याने त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. नावेद ऑनलाइन स्टिरॉईड मागवत असे आणि शरीरात इंजेक्ट करून घेत असल्याची माहिती नावेदची आई रेश्मा खान दिली आहे. तसेच त्यांनी तरुणपिढीला चांगल्या शरीरयष्टीसाठी स्टिरॉइडच्या मागे लागू नका असा सल्ला देखील दिलाय. नावेदचे जिम ट्रेनर बनण्याचे स्वप्न मात्र त्याच्या अकाली निधनाने अपुरे राहिले. 

 

टॅग्स :मृत्यूकेईएम रुग्णालयमुंब्राशरीरसौष्ठव