Talai Landslide: मोठी बातमी! दुर्घटनाग्रस्त तळीये गाव नव्याने वसविणार, म्हाडानं घेतली जबाबदारी; आव्हाडांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:16 PM2021-07-24T18:16:41+5:302021-07-24T18:17:41+5:30
Talai Landslide: महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. परंतु आता म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा नव्याने गाव वसविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ट करुन दिली आहे. त्यानुसार जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहे, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणात झालेल्या पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यात महाड येथील तळीये गावावर दोन दिवसापूर्वी दरड कोसळून संपूर्ण गावच यात नष्ट झाले आहे. या दुर्देवी घटनेत आतार्पयत ५२ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या ठिकाणी जाऊन शनिवारी पाहणी केली. त्यानंतर लागलीच राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या आदेशानंतर लागलीच येथील गाव पुन्हा नव्याने निर्माण करण्याची घोषणा केली आहे. म्हाडाच्या माध्यमातून हे गाव पुन्हा उभे केले जाईल अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
याठिकाणी नेमकी किती घरे होती, उद्यान होते का?, मंदिर, मस्जिद, दवाखाना आदींसह काय काय होते, याची माहिती येत्या काही दिवसात घेतली जाणार आहे. शोध कार्य थांबल्यानंतर तसेच पावसाने उसंत घेतल्यानंतर म्हाडाच्या माध्यमातून येथील पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार त्याची रुपरेषा ठरवून येथे पुन्हा तळीये गाव नव्याने उभारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान येथे जेवढी घरे जमीनीत गाढली गेली, तेवढी घरे पुन्हा नव्याने तेही पक्या स्वरुपात उभारली जाणार आहेत. या घरांना पुढील ३० वर्षे काही होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इतर ज्या काही सुविधा होत्या, त्या सुविधाही पुरविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.