Join us

महाडमध्ये तलाठी समस्या कायम

By admin | Published: June 11, 2015 10:52 PM

महाड तालुका जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. महसुली उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, विविध राजकीय दौरे आणि पर्यटन क्षेत्र असल्याने नेहमीच महसूल

दासगाव : महाड तालुका जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. महसुली उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, विविध राजकीय दौरे आणि पर्यटन क्षेत्र असल्याने नेहमीच महसूल विभागावर कामाचा बोजा असतो. असे असतानाही गेल्या तीन वर्षांपासून महाड तालुक्यात तलाठ्यांची सात पदे रिक्त होती. यंदा ही समस्या दूर होईल असे वाटत होते, मात्र समस्या वाढली असून नवीन पाच तलाठी तालुक्यासाठी देण्यात आले व सहा तलाठ्यांची बदली करण्यात आली. यामुळे आता आठ पदे रिक्त झाली आहेत. अशा या शासनाच्या अजब कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.१८३ महसुली गावांचा कारभार केवळ ३६ तलाठी चालवत आहेत. शासनाने गेल्या अनेक वर्षांत महाड तालुक्यात नवीन भरती केली नसल्याने या ३६ तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यातच बदली झालेल्या रिक्त जागा न भरल्या गेल्याने तालुक्यातील तलाठी पदांच्या रिक्त संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांकरिता तलाठ्यांची गरज भासणार आहे. मात्र महाड तालुक्यात तलाठी पदांची समस्या कायम असतानाच लीना गुरव आणि शीतल म्हात्रे या दोन महिला तलाठ्यांची नेमणूक महाडमध्ये असताना सध्या त्या दोन्ही तलाठी अलिबागमध्ये काम करीत आहेत. यापैकी शीतल म्हात्रे यांना महाडमध्ये आणण्याऐवजी त्यांची बदली श्रीवर्धन येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०१० मध्ये सी.एल.पवार या तलाठी कर्मचाऱ्याची बदली म्हसळा येथे करण्यात आली होती. सदर तलाठी अद्याप आपल्या बदलीचा आदेश घेण्यास आलेला नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे हा गायब तलाठी कुठे आहे याचा थांगपत्ता महसूल विभागाने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. महाड तालुक्यामध्ये महाड शहर मोठ्या महसुली गावाकरिता असलेले तलाठी सावंत हे गेले कित्येक दिवसांपासून कार्यालयाकडे फिरकले नसल्याने महाड कार्यालय बंद आहे. महाड तालुक्याच्या तलाठ्यांची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून पाच तलाठी वाढवले, मात्र तलाठी देत असताना येथील तलाठ्यांची बदली करण्याचा अजब कारभार प्रशासनाकडून झाला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाड तालुक्यावर अन्याय होत आहे. याबाबत स्थानिक आमदार देखील लक्ष घालत नसल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच परवड होत आहे. (वार्ताहर)