भिवंडीतील विनापरवाना वीट व्यवसायास तलाठी जबाबदार
By admin | Published: September 23, 2014 11:56 PM2014-09-23T23:56:03+5:302014-09-23T23:56:03+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात विनापरवाना गौणखनिज उत्खनन व व्यवसाय करणाऱ्या वीटभट्टीमालकांवर जिल्हाधिका-यांच्या आदेशाने दंडात्मक कारवाई करण्यात आली़
भिवंडी : तालुक्यातील ग्रामीण भागात विनापरवाना गौणखनिज उत्खनन व व्यवसाय करणाऱ्या वीटभट्टीमालकांवर जिल्हाधिका-यांच्या आदेशाने दंडात्मक कारवाई करण्यात आली़ मात्र, ज्या शेतात वीटभट्ट्या लागल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविल्याने शेतकरी व वीटभट्टीमालक हवालदिल झाले असून याकडे दुर्लक्ष करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, अशी विचारणा जनमानसातून केली जात आहे.
भिवंडीतील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वीटभट्टीचा व्यवसाय सुरू असून त्यापैकी काही जण महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून विनापरवाना वीट व्यवसाय करीत आहेत. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील विकासकांकडून विटांची मागणी दिवसेंदिवस वाढल्याने या तालुक्यात वीटभट्ट्या वाढल्या आहेत. मात्र, हे वीटभट्टीधारक विनापरवाना व्यवसाय करतात, हे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील काही भागांत वीटभट्टीवर प्रत्यक्ष भेट दिली. त्या वेळी त्यांच्याकडे कोणतेही परवाने नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कठोर पावले उचलून स्थानिक उपविभागीय अधिकारी संजय सरवदे यांना शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार २३० वीट उत्पादकांना नोटिसा बजावून रॉयल्टीची रक्कम त्यांच्या सातबारावर चढविण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वीटभट्टी सुरू असल्याची माहिती असतानादेखील स्थानिक तलाठ्यांनी वीटभट्टीमालकांवर कोणतीही दंडनीय कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचा महसूल वसूल करण्यात व नियमाचे पालन करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी तलाठ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)