Join us  

तलाठी कार्यालयांमध्ये दलालांची बजबजपुरी

By admin | Published: May 26, 2014 4:20 AM

कल्याण तालुक्यातील महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयांमध्ये सध्या दलालांची बजबजपुरी झाली

खडवली : कल्याण तालुक्यातील महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयांमध्ये सध्या दलालांची बजबजपुरी झाली असून, हेच खासगी कर्मचारी बिनधास्त सरकारी दस्तावेज हाताळत असल्याने आणि तलाठ्यांना हातात धरून आर्थिक साटेलोट्याने येथे कामे करीत असल्याने महसूल विभागाचे हेच कार्यालय सध्या दलालांचा अड्डा बनले आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून संबंधित तलाठी मंडळ अधिकारी दलांलाच्या हातून आर्थिक व्यवहार करीत असल्याने सामान्य गोरगरिबांच्या कामाला हेच तलाठी येथे हात लावत नसल्याचे ऐकायला मिळत आहे. तरीही महसूल अधिकार्‍यांचे याकडे लक्ष जात नसल्याने आणि अशा खासगी दलालांवर कारवाई होत नसल्याने महसूलचा कारभार दिवसेंदिवस अधिक भ्रष्ट होत आहे ़ कल्याण तालुक्यातील महसूल विभागाचे तलाठी कार्यालय सध्या गरजू जनतेने कमी, तर दलालांनी, तसेच खासगी कर्मच्यार्‍यांनी अधिक भरलेले दिसते. याठिकाणी खासगी दलाल बिनधास्त सरकारी दस्तावेज हाताळत असल्याने बर्‍याच लोकांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये गोंधळ होत असल्याचे येथे दिसते. उसाचा रस, चहा, जेवण, नाश्ता सर्व काही तलाठी कार्यालयात जागेवर येत असल्याने याच तलाठ्यांना जनतेची कामे करण्यास, तसेच फेरफार सातबारा बघण्यास वेळच मिळत नाही ़ यासंदर्भात कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)