तलासरी पंचायत समिती अधांतरी
By admin | Published: January 31, 2015 12:05 AM2015-01-31T00:05:57+5:302015-01-31T00:05:57+5:30
पहिल्याच निवडणुकीमध्ये जि. प. च्या ५७ जागापैकी भाजपाने २१ जागा जिंकून कमळ फुलविले. तर १५ जागावर सेनेला समाधान मानावे लागले तर बविआने दहा
हितेन नाईक, पालघर
पहिल्याच निवडणुकीमध्ये जि. प. च्या ५७ जागापैकी भाजपाने २१ जागा जिंकून कमळ फुलविले. तर १५ जागावर सेनेला समाधान मानावे लागले तर बविआने दहा जागा जिंकल्या.जिल्हापरिषदेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २९ जागांची आवश्यकता असून तो गाठण्यासाठी शिवसेना-भाजपा मध्ये युती होते की भाजपा-बविआ हे नवीन समीकरण जन्माला येते हे येत्या काही दिवसात दिसून येईल. पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागासाठी २४१ उमेदवार तर ८ तालुक्यातील पंचायत समितीच्या ११४ जागासाठी १७९ उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदेसाठी भाजपाने सर्वाधिक ५० उमेदवार ंिरंगणात उतरविले होते तर त्या खालोखाल शिवसेनेने ४५, बहुजन विकास आघाडीने ३८ जागावर, काँग्रेसने २५, माकपाने २२, राष्ट्रवादीने केवळ १९ जागावर तर मनसेने अवघ्या पाच जागावर निवडणूक लढविली होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत ५७ जागापैकी भाजपाचे २१ जागावर उमेदवार विजयी झाली असून सेनेचे १५, बविआचे १०, माकपचे ५, राष्ट्रवादीचे ४ तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले.
मोखाडा पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकाविण्यात सेनेला यश मिळाले असून ६ पैकी ३ जागा सेनेने, भाजपा १ तर राष्ट्रवादीने २ जागा जिंकल्या तर जिल्हापरिषदेच्या तीन जागापैकी १ जागा सेना, १ भाजपा तर १ राष्ट्रवादीने जिंकली.
डहाणू पंचायत समितीत सध्या तरी त्रिशंकू अवस्था असून २४ जागापैकी भाजपाने सर्वाधिक १० जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने ६, माकपाने २, सेना २, तर बविआने ४ जागा जिंकल्या आहेत. तर जिल्हापरिषदेच्या १२ जागापैकी भाजपाने ५ जागा जिंकल्या आहेत. जिल्हापरिषदेच्या १२ जागा पैकी भाजपाने ५ जागा, राष्ट्रवादीने २, माकपाने २, बविआने २ तर काँग्रेसने १ जागा जिंकून भोपळा फोडण्यात यश मिळविले तर सेनेच्या एकाही उमेदवाराला विजय संपादन करता आला नाही.
वाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादीला झटका देत भाजपाने सत्तेच्या दिशेने आपली वाटचाल केली व १२ जागापैकी ६ जागा जिंकल्या. सेनेचे पाच उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला. तर जि. प. च्या सहा जागापैकी सेनेचे चार जागावर तर भाजपाचे २ जागावर उमेदवार विजयी झाले. यावेळी सेनेने पंचायत समितीमधील पिछाडी भरून काढण्यात यश मिळविले.
विक्रमगड पंचायत समितीवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता खेचून घेण्यात भाजपाला यश आले असून १० जागापैकी ६ जागा जिंकून घेतल्या तर सेनेला २ जागावर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी १ जागा व माकपाने १ जागा जिंकली तर जिल्हापरिषदेच्या ५ जागा पैकी भाजपाने ४ जागा जिंकून तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर सेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.
जव्हार पंचायत समितीवर भाजपाने १० पैकी ५ जागा जिंकून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आपला दावा प्रबळ केला असून सनेला ३ जागा तर माकपाने २ जागा जिंकल्या आहेत तर जिल्हापरिषदेच्या ५ जागापैकीही ३ जागा भाजपाने जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून सेनेला एक तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.