संमेलनात तरुणाईच्या प्रतिभेचे कवडसे ‘प्रकाशमान’ व्हावेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:05 AM2021-03-01T04:05:18+5:302021-03-01T04:05:18+5:30
युवा साहित्यिकांनी व्यक्त केला आशावाद; ‘प्रस्थापित मंडळींचे संमेलन’ ही ओळख पुसण्याची गरज स्वप्निल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
युवा साहित्यिकांनी व्यक्त केला आशावाद; ‘प्रस्थापित मंडळींचे संमेलन’ ही ओळख पुसण्याची गरज
स्वप्निल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी एका संमेलनाची सांगता होत असतानाच पुढचे संमेलन कुठे भरवायचे याची चर्चा महामंडळ सुरू करते. याबाबतीत मात्र महामंडळ भलतेच ‘तत्पर’ असते. परंतु साहित्य संमेलनातून समाजाला विशेषतः उद्याचे भविष्य असलेल्या तरुणाईला काय मिळाले याचा विचार करताना कुणी दिसत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाबद्दल तरुणाईच्या मनात काहीशी नकारात्मकता पाहायला मिळते. ‘प्रस्थापित मंडळींचं संमेलन’ अशी ओळख पुसून तरुणाईला सोबत घेऊन सामाजिक उन्नतीचे उपक्रम हाती घेतले तर साहित्य संमेलनात तरुणाईच्या प्रतिभेचे कवडसे ‘प्रकाशमान’ झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद तरुणाई व्यक्त करताना दिसत आहे.
विभिन्न साहित्यप्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या युवा साहित्यिकांच्या परस्परभेटी व्हाव्यात, रसिकांनाही त्यात सामावून घेता यावे, ‘लेखक हा प्रकट वाचक आणि वाचक हा मूक लेखक’ न उरता प्रत्यक्षातही एकमेकांशी विचारांचे, भावनांचे आदानप्रदान करता यावे हे साहित्य संमेलनाचे खरे उद्देश सफल होणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी काय बोलत आहे, त्यांचा विचार काय आहे याचा कानोसा घेणे महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांमधूनच त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहील.
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर लेखकांच्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर मुलाखती घेतल्या जात आहेत, चर्चेत असलेल्या, गाजत असलेल्या पुस्तकावर वाचक त्या लेखकाला थेट प्रश्न विचारताहेत असे इतर अनेक फेस्टिव्हलमध्ये दिसणारे संवादी चित्र मराठी साहित्य संमेलनामध्ये दिसत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनातील हे कोरडेपण संपून संमेलनाचा खरा आनंद मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया
तरुणाईच्या हातात असलेल्या डिव्हाईसेसच्या माध्यमातून दररोज एक संमेलन व्हावं, एवढे साहित्य प्रसिद्ध होत असते. त्याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष साहित्य संमेलनात कुठंही आढळून येत नाही. साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित मंडळींचे, एका विशिष्ट समूहाद्वारे आयोजित केले जाणारे आणि सवंग प्रसिद्धीसाठी राजकीय संदर्भाचे काही उपक्रम अशी संमेलनाची ओळख होत जाणे मराठी माणूस आणि समस्त तरुणाईसाठी धोक्याचे लक्षण आहे.
- व्यंकटेश कल्याणकर, व्याख्याता, ब्लॉगर
साहित्य संमेलनामध्ये एक प्रकारचा तोच-तोपणा आला आहे. अनेकदा साहित्य संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलने आदी कार्यक्रमांत तीच ती नावे पाहायला मिळतात. साहित्याचा उत्सव असणाऱ्या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष ठरविण्यासाठी किती तरुणांना मतदानाचा अधिकार मिळतो? छोटी-छोटी संमेलने खूप महत्त्वाची ठरतात. कारण, त्या त्या भागातल्या प्रतिभेला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठ मिळते. साहित्य संमेलनाव्यतिरिक्त वर्षभर ग्रंथप्रदर्शनासारखे उपक्रम संमेलन आयोजन समितीने हाती घेणे आवश्यक आहे.
- प्रणव सखदेव, अनुवादक, लेखक