तालियाँ... अमित शाहंसमोर दिवंगत वडिलांचे स्मरण करुन पंकजा मुंडेंची शायरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:18 PM2024-03-06T12:18:30+5:302024-03-06T12:19:30+5:30
अमित शाह यांचं इथं येणं हे भविष्यात येथील मैदानात ताकदीने उतरण्याचं द्योतक आहे.
छ. संभाजीनगर/मुंबई - विधानपरिषद झाली, राज्यसभा झाली तरीही पंकजा मुंडेंना संधी न दिल्याने भाजपातील मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही पक्षात नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत असते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. आता, छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करायचं असल्याचं म्हटलं. यावेळी, आपल्या भाषणाची सुरुवात करताना, शायरीतूनच त्यांनी वडिल दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुडेंची आठवणी काढली.
अमित शाह यांचं इथं येणं हे भविष्यात येथील मैदानात ताकदीने उतरण्याचं द्योतक आहे.
जिंदगी के रंगमंचपवर कुछ इस
तरह निभाया अपना किरदार
परदा गिर गया, लेकीन,
तालियाँ फीर भी गुंज रही है
असं ज्यांनी काम केलं त्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन, असे म्हणत पंकजा मुंडेंनी संभाजीनगर येथील सभेत आपल्या भाषणाला सुरुवात केली. या देशाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती, गरिबांच्या स्वप्नाला ठिगळं लावण्याची. खुल्या आकाशातून स्वत:च्या पक्क्या घरात पोहोचण्याची. माता भगिनींच्या डोळ्यातलं पाणी नळातून घरात आणण्याची तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाला लाभले. मोदी सरकारच्या या योजनांनी आपल्या देशाला २०४७ मध्ये १०० वर्षाच्या पूर्तीकडे नेण्यासाठी पायाच रचला आहे, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.
ज्या फाटक्या तंबूत प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं, त्यांना मंदिरात नेण्याला यश आलं आहे. तर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेऊन रामराज्याकडे डोळ्यात आशा लावून वाट पाहणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की रामराज्य आलं आहे, हे दायित्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारलं आहे. मोदींनी देशाला गॅरंटी दिली आहे, आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करु, तरुणांना रोजगार देऊ. या स्वप्नपूर्तीच्या यज्ञात आपणास आहुती द्यायची आहे, असेही पंकजा यांनी आपल्या भाषणात म्हटले.
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर केंद्रीय गृहमंत्री मा. श्री अमितभाई शाह यांनी भव्य जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.… pic.twitter.com/ihKToJ3t6G
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 5, 2024
राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे, एक इंजिन असेल तर ट्रेन वेगात धावते, दोन असेल तर अधिक वेगात धावते, आणि तीन असल्यावर आणखी वेगात धावलं पाहिजे. त्यामुळे, महाराष्ट्रातून अमितभाईंना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, असं काम सर्वांनी केलं पाहिजे, एवढी शक्ती अमितभाईंच्या विचारांनी महाऱाष्ट्रात ओतली आहे. त्यामुळे, अमितभाईंनी दुसऱ्या राज्यात लक्ष दिले पाहिजे. असं आश्वासन मंचावरील सर्वांनी त्यांना दिलं पाहिजे, त्यासाठी मी माझ्या परीने छोटासा वाटा उचलायला तयार आहे, असे म्हणत पंकजा यांनी महाराष्ट्रातून भाजपाला सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असे म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनीही सर्वाधिक जागेचा दिला विश्वास
मला भाजपात आल्यानंतर जनसभेला संबोधित करण्याची ही पहिलीच संधी दिली. भाजपा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासांतच मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, तो माझ्यावर ठेवलेला मोठा विश्वास आहे, काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आल्याचे मी समजतो. देशभरात आपण ४०० पारचा संकल्प केला आहे, पण मराठवाडाच नाही, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा भाजपा महायुतीच्या निवडून येणार, त्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.