भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:58 AM2024-06-28T05:58:16+5:302024-06-28T05:59:19+5:30
अधिवेशनातील राजकीय ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झाल्या गुजगोष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे कट्टर विरोधक गुरुवारी विधानभवनात अचानक आमनेसामनेच आले नाहीत, तर लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर एकत्रितपणे गेले. योगायोगाने झालेल्या या भेटीची माध्यमांतून खूप चर्चा रंगली, पण त्याचवेळी झालेल्या दुसऱ्या एका भेटीची मात्र कुठलीही बातमी झाली नाही.
ही दुसरी भेट झाली ती उपमुख्यमंत्री फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात. जवळपास १५ मिनिटे तिघेच एकत्र होते ते फडणवीस यांच्या दालनात. विधानसभेचे कामकाज लवकरच संपले. ते संपताच वडेट्टीवार, पटोले आणि फडणवीस यांच्यात खाणाखुणा झाल्या. ‘माझ्या दालनात या’ असे फडणवीसांनी या दोघांना खुणावले आणि लगेच ते दोघे फडणवीसांच्या दालनात पोहोचले. आमदारांसाठी निधीची तरतूद करताना सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यात भेदभाव करू नये, अशी विनंती त्यांनी फडणवीस यांना केली. आपापल्या जिल्ह्यातील विकासकामांबाबतही ते बोलले, अशी माहिती आहे.
मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगच आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करू. - उद्धव ठाकरे
चर्चेला ‘लिफ्ट’
- उद्धव ठाकरे हे दुसऱ्या मजल्यावरील विधानपरिषद सभागृहात जाण्यासाठी लिफ्टजवळ उभे होते. फडणवीसही तिथे आले. दोघांमध्ये अडीच-तीन मिनिटे चर्चा झाली.
- तेवढ्यात लिफ्ट आली आणि दोघे एकत्रितच दुसऱ्या मजल्यावर गेले. लिफ्टमध्येही ते एकमेकांशी बोलले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ही भेट म्हणजे योगायोग होता, त्याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नये.
मुलींच्या मोफत शिक्षणाचे ‘चॉकलेट’
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, पाटील यांनी मला भेटून चॉकलेट दिले. मुलींच्या मोफत शिक्षणाचे चॉकलेट त्यांनी दिले होते, ते आश्वासन पोकळ ठरले आहे. त्यामुळे आता योजनांची चॉकलेटे देऊ नका.
एकीकडे भेट तर दुसरीकडे कानगोष्टी
विधानभवनच्या पायरीवर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्यातही बराचवेळ कानगोष्टी सुरू होत्या. एकूणच सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यात प्रचंड ताणतणाव या अधिवेशनात राहील, असे म्हटले जात असताना कुठे योगायोग तर कुठे ठरवून गुजगोष्टी झाल्या.
चंद्रकांत पाटील अन् पेढा
- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट आणि त्याचवेळी अनिल परब यांना तुम्ही निवडणूक जिंकत आहात असे केलेले विधान यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली.
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पाटील गेले. ठाकरे आणि काही आमदार तिथे होते. पाटील यांनी त्यांना चॉकलेट दिले, तर ठाकरे यांनी पाटील यांना पेढा दिला, आमच्या विजयाचा हा पेढा आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यावर परब यांना पेढ्याचा तुकडा देत पाटील म्हणाले, तुम्ही विधानपरिषदेची निवडणूक जिंकत आहात, त्याचा हा पेढा आहे.