बैठकीच्या नाट्याची ‘स्वरसम्राज्ञी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:04 AM2018-06-16T06:04:56+5:302018-06-16T06:04:56+5:30
शिक्षक शिकवायला आलेत नाट्यसंगीत; पण तिचा आपला फक्कड लावणीच्या सुरांचा आग्रह. अस्सल लोकभाषेतील शाब्दिक अभिनयातून हा प्रसंग संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी बैठकीच्या नाट्याद्वारे रसिकांसमोर सादर केला आणि कंठातून नाट्यपदाचे नव्हे, तर ‘कशी केलीस माझी दैना, मला तुज्या बिगर करमेना’ या आळविलेल्या लावणीच्या स्वरांनी ही नाट्यमैफल अविस्मरणीय केली.
मुंबई : शिक्षक शिकवायला आलेत नाट्यसंगीत; पण तिचा आपला फक्कड लावणीच्या सुरांचा आग्रह. अस्सल लोकभाषेतील शाब्दिक अभिनयातून हा प्रसंग संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी बैठकीच्या नाट्याद्वारे रसिकांसमोर सादर केला आणि कंठातून नाट्यपदाचे नव्हे, तर ‘कशी केलीस माझी दैना, मला तुज्या बिगर करमेना’ या आळविलेल्या लावणीच्या स्वरांनी ही नाट्यमैफल अविस्मरणीय केली.
निमित्त होते, ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आयोजित संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या मुलाखतीचे. प्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांनी शिलेदार यांच्याशी संवाद साधत संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडला. ‘सृजन कसा मन चोरी’, ‘नाथ हा माझा मोही मना’, अशा नाट्यपदांचे सादरीकरण आणि रंगभूमीच्या आठवणींचा पट या माध्यमातून ही मुलाखत रंगली. आई आणि वडिलांनी आमच्यावर संगीताचे संस्कार केले. जे गाणे सादर कराल त्याला अभिनयाचा स्पर्श असला पाहिजे, हे सांगताना आईनेच माझ्या आवाजाची वरची पट्टी शोधून काढली, असे सांगून कीर्तीतार्इंनी स्वरातील चढउताराचे प्रात्यक्षिक दिले.
संगीत शारदामधील ‘वल्लरी’ची भूमिका करण्याची इच्छा असतानाही नानांनी शारदा भूमिका कशी करायला लावली? लहानपणी नाटक पाहायला गेले असताना एका कलाकाराने चष्मा काढल्यानंतर ‘कुठे आहे प्रिया’ असे उच्चारताना तो कसा खाली पाहायचा; आणि मग घरी आल्यानंतर कुठे आहे प्रिया म्हणून आम्ही दोघी कशी त्या कलाकाराची टिंगल करायचो, हे त्यांनी निरागस अभिनयातून दाखविताना रसिकांना हसू आवरले नाही. मात्र, दुसऱ्याची टिंगल करताना आपल्या अभिनयाची कशी टिंगल होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असा धडा नानांनी आम्हाला नकळतपणे दिला असल्याचे त्या म्हणाल्या.
चित्रपटात कधी गावेसे वाटले नाही का, असे विचारले असता चित्रपटात गेल्यानंतर कलाकारावर अन्याय होतो अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
चित्रपटातील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे नानांचे गाणे खूप गाजले. पण नाटकामध्येही त्यांना सातत्याने तेच गाणे सादर करण्याचा आग्रह होऊ लागला. कलाकारांना वेगळ्या भूमिकांचा अनुभव घ्यायचा असतो, पण त्याच्या गाजलेल्या भूमिकांचे आक्रमण होते, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.