Join us  

मृत भावाच्या नावाने वडिलांशी संवाद

By admin | Published: October 17, 2015 2:51 AM

कुर्ला येथे सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत अनिल कनोजिया याचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या वडिलांना पुन्हा धक्का बसू नये

मनीषा म्हात्रे, मुंबईकुर्ला येथे सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत अनिल कनोजिया याचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या वडिलांना पुन्हा धक्का बसू नये, यासाठी अरविंदचा भाऊ विजय त्यांच्याशी अरविंद म्हणून बोलत होता. बराच वेळ हा संवाद चालला आणि विजयने फोन कट केला आणि वेळ निभावून नेली.विरार येथे राहणारा ३२ वर्षीय सिव्हिल इंजिनीयर अरविंद कनोजिया कुर्ला येथील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत मरण पावला. तो आई, वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुलांसोबत विरारमध्ये राहत होता. सिव्हिल इंजिनीअरिंग केल्यानंतर कुर्ला कमानी नगर येथील स्टर्लिंग कंपनीत ते डिझाइन इंजिनीअर म्हणून सात वर्षांपासून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे अरविंद आजही कामावर आले. मित्रांसोबत गप्पांची मैफल रंगली. दुपारी एकच्या सुमारास नेहमीच्या अड्ड्यावर चायनिज खाऊन येतो, असे सांगून ते कुर्ला कमानी नगर येथील सीटी किनारा हॉटेलमध्ये आले होते. लंच ब्रेक संपून बराच वेळ झाला तरी, ते न आल्याने सहकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास त्यांचा शोध सुरू होता. काही क्षणातच सीटी किनारा हॉटेलमध्ये आग लागल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. मित्रांनी तेथेही त्यांचा शोध घेतला.मृतांच्या यादीत पहिले नाव अरविंदचे होते. ही माहिती त्यांचा भाऊ विजयला समजली. त्यांच्या वडिलांना नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अशात मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली तर त्यांनाही गमावण्याच्या शक्यतेने विजय व्याकूळ बनला होता. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन ही माहिती देऊ , या विचाराने त्याने स्वत:च्याच मनाला धीर दिला. मृत झालेल्या अरविंदच्या नावाने तो वडिलांशी बराच वेळ बोलत राहिला. ‘माझी काळजी करू नका, मी ठीक आहे’, असे सांगणाऱ्या विजयचा संवाद राजावाडीत ते पाहणाऱ्या अनेकांना हेलावून गेला. >>‘ती’ बचावासाठी विव्हळत होती...लिनल गावडे, मुंबईकुर्ला येथे आग लागून ८ जणांचा मृत्यू झाला तेव्हा सगळेच विव्हळले. आक्रोशाने सगळा आसमंत भरून राहिलेला येथे अनेकांनी अनुभवले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दृश्यांनी अनेकांना रडू कोसळले.मुलीची मदतीची याचनानेहमीप्रमाणे चाळीच्या नाक्यावर गप्पांची मैफल रंगली होती. त्यात अचानक आगीचे लोळ उठताना दिसले. आगीमुळे काचा फुटल्या होत्या. हॉटेलच्या दिशेने धाव घेतल्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडत असलेल्या खिडकीतून एक मुलगी बचावासाठी मदतीची याचना करत होती. मात्र काही वेळाने तिचा आवाजही बंद झाला. तिला वाचवण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. अशात अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच त्यांनी तिचा मृतदेह बाहेर काढल्याची अंगावर थरकाप उडविणारी माहिती प्रत्यक्षदर्शी सागर गुरव याने ‘लोकमत’शी बोलताना दिली....तोही ठरणार होता बळीडॉन बॉस्को महाविद्यालयात सकाळी १० ते दुपारी १२.३० च्या सुमारास परीक्षा सुरू होत्या. त्यानुसार शुक्रवारी ‘कल्चरल स्टडी’ या विषयाचा पेपर देऊन अनेक जण बाहेर जेवायला गेले होते. त्यानुसार साजिद -सार्जिल यांनी नमाज पढून येतो, असे आपल्या लेनार्ट डिसूझा नावाच्या मित्राला सांगितले. नमाजला जाऊन येतो, म्हणून तो त्यांची वाट पाहत कॉलेजात थांबला. काही कालावधीतच आगीची घटना कळली आणि लेनार्ट घटनास्थळी पोहोचला. आपल्या मित्रांच्या स्कूटर पाहून त्याला यात साजिद आणि सार्जिल या घटनेत दगावल्याचा अंदाज आला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना फोन लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागलाच नाही. नमाजचे कारण दिले नसते, तर लेनार्टसुद्धा त्यांच्यासोबत जाणार होता.>>राजावाडीत हंबरडे...जेवणाला घरी आला असता तर...मृतांच्या यादीत आपल्या मुलाचे नाव जसे-जसे समोर येते होते, तसतशी राजावाडी रुग्णालयात पालकांचा हंबरडा फुटत होता. मुलाच्या निधनाच्या बातमीने सार्जिलचे आईबाबा पूर्णत: अस्वस्थ झाले होते. कुर्ला पश्चिमेकडील प्रीमियर सोसायटीत सार्जिल, आई-बाबा, बहीण आणि एका लहान भावासोबत राहण्यास होता. आज परीक्षा असल्याने तो उशिरा घराबाहेर पडला, म्हणून आईने त्याला घरी जेवणासाठी बोलावले होते. मात्र तो काहीही न बोलता निघून गेला तो परतलाच नाही, हे सांगताना त्याची आई रहेना यांना रडू आवरत नव्हते.>>मजा, मस्ती करून नेहमीप्रमाणे लेक्चरमध्ये ‘अरे भूक लागली रे...’ असे सांगून ते पाच मित्र चायनिजचा आस्वाद घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सीटी किनारा हॉटेलमध्ये आले होते. डॉन बॉस्कोमध्ये इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या साजिद चौधरी, ब्रायन फर्नांडो, आकाश थापर, सार्जिल शेख, ताहा शेख अशी या मित्रांची नावे. बराच वेळ झाला, तरी ते परतले नाही, म्हणून त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांचे मित्र करू लागले. एकामागोमाग एक पाचही जणांचे फोन बंद, नेमके काय झाले? अशा विचारांनी मित्रांचा गोंधळ उडाला होता.अखेर लेक्चर बाजूला ठेवून मित्रांच्या एका ग्रुपने हॉटेलकडे धाव घेतली. जळून खाक झालेली हॉटेलबाहेर पार्क केलेली मित्रांची अ‍ॅक्टिवा पाहून या मित्रांच्या हृदयाचा ठोकाच चुकल्याचे सुमन देव याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.