Join us

मेट्रो भूमिगत प्रवासात मोबाइलवर बिनधास्त बोला; विना अडथळा इंटरनेट सर्फिंगदेखील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 11:29 AM

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कुलाबा ते सिप्झदरम्यान मेट्रो ३ चालवण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कुलाबा ते सिप्झदरम्यान मेट्रो ३ चालवण्यात येणार आहे. मेट्रो ३चे काम युद्धपातळीवर सुरू असून, मुंबईकरांना लवकरच या भूमिगत मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. इतकेच काय तर भुयारी मेट्रोतून प्रवास करताना मोबाइलवर विना अडथळा बोलता येणार आहे. इतकेच नव्हे तर विना अडथळा इंटरनेट सर्फिंगदेखील करता येणार आहे.

आरे ते बीकेसी हा मेट्रो ३चा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी एमएमआरडीएकडून जमिनीखाली २० मीटर खोलीपर्यंत अँटेना बसवले जाणार आहेत. हे काम सौदी अरेबियातील कंपनीला देण्यात आले आहे.

एमएमआरसीचा करार

ही मार्गिका उभ्या करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सौदी अरेबियाच्या कंपनीशी करार केला आहे. ‘एसेस’ या कंपनीच्या एसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीला निविदा प्रक्रियाद्वारे या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

नेटवर्क उपलब्ध करणे आव्हानात्मक

  राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून मेट्रो ३ ओळखली जाते. विविध टप्प्यांत मेट्रोचे काम केले जात आहे.

 या मार्गिकेतील तिकीट खिडक्या जमिनीच्या खाली १०.१४ मीटर तर प्रत्यक्ष स्थानकांचे फलाट हे जमिनीच्या खाली १८ ते २० मीटर खोलीवर आहेत.

 त्यामुळे भुयारी मार्गात मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करणे, हे या प्रकल्पातील आव्हान होते.