‘मातोश्री’वरील मारहाणीची ती चर्चा खोटी : राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:59 IST2025-01-03T12:58:08+5:302025-01-03T12:59:05+5:30

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरे प्रत्येकाशी भेटून चर्चा करत आहेत...

Talk of assault on 'Matoshree' is false says Sanjay Raut | ‘मातोश्री’वरील मारहाणीची ती चर्चा खोटी : राऊत

‘मातोश्री’वरील मारहाणीची ती चर्चा खोटी : राऊत

मुंबई : उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाल्याची बोंब सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावर खा. राऊत यांनी गुरुवारी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण केले. तसेच, भाजपच्या आयटीसेलनेच खोट्या बातम्या पसरविल्या, असा आरोपही त्यांनी केला.

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी  राऊत आणि अन्य नेत्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर राऊत यांना मारहाण करण्यात आली, अशी पोस्ट  व्हायरल झाली होती. त्याबद्दल स्पष्टीकरण करताना राऊत म्हणाले, गेले काही दिवस मी मुंबईबाहेर असून आज मुंबईत परत आलो आहे. मातोश्री येथे अशी कोणतीही बैठक झाली नाही.

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरे प्रत्येकाशी भेटून चर्चा करत आहेत. विधानसभेत अपयश का आले? याचे कारण सर्वांना माहीत आहे. तोच प्रयोग महापालिका निवडणुकीतही होणार आहे परंतु, आम्ही संघर्ष करू आणि जिंकू, असे राऊत यांनी सांगितले.

बदनामीची ही नवी मोहीम, आनंद घ्या
बीडमधील सरपंचाच्या हत्येचा राज्य सरकारच्या एका मंत्र्याशी संबंध आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचा आयटी सेल अशा बातम्या पसरवत आहे. माझ्याविरोधात आता ही नवी मोहीम राबवणार असाल तर त्याचा आनंद घ्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

त्यांनी न्यायाची बाजू घ्यावी
वाल्मीक कराड प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट झाली आहे. अशा घटनांमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारीने काम करतोय हे दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे, असे राऊत म्हणाले.

Web Title: Talk of assault on 'Matoshree' is false says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.