प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:35 AM2021-06-21T08:35:53+5:302021-06-21T08:43:56+5:30

वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Talk of a political quake again; after Shivsena MLA Pratap Sarnaik letter sparks controversy | प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू

Next

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामुळे रविवारी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशीचे हे पत्र दहा दिवसानंतर आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमात आले.  

वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे.

ठाकरे यांनी ८ जूनला राजधानी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली होती. मोदी-ठाकरे यांच्यात बंद खोलीत स्वतंत्र चर्चाही झाल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ जूनला सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले. मुख्यमंत्री कार्यालयाने १० जूनला पत्र मिळाल्याची पोच दिल्याचाही शिक्का पत्रावर आहे. 

पत्रात सरनाईक यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाने शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा मुद्दा मांडला. भाजपसोबतच्या वितुष्टामुळे आपल्या कुटुंबामागे चौकशीचा ससेमिरा लागला. अशीच परिस्थिती मंत्री अनिल परब आणि आमदार रवींद्र वायकर यांची आहे. राज्यात सत्ता असूनही कसलीच मदत झाली नाही. या लढ्यात एकाकी पडल्याची भावनाही सरनाईक यांनी मांडली आहे. 

‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू!

शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क साधून ‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची स्वबळाची भाषा आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी अशाच सुरू राहिल्यास शिवसेना वेगळा विचार करू शकते, असा इशाराही या पत्राच्या माध्यमातून दिला आहे. 

Web Title: Talk of a political quake again; after Shivsena MLA Pratap Sarnaik letter sparks controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.