मुंबई- नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाला माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली आहे. आमदार मलिक कोणत्या बाजूच्या बाकावर बसणार यावरुन जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. विरोधकांनीही सवाल उपस्थित करत भाजपवर टीका केल्या, यावर का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली, या पत्रावरुनही आता फडणवीस यांच्या टीका सुरू झाल्या आहेत.
"नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना..."; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत सवाल उपस्थित केले आहेत. नवाब मलिकांच्यावर तुम्ही आरोप करता मग त्याच प्रकारची केस खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे त्यांचीही ईडीने प्रॉपर्टी ईडीने जप्त केली आहे. त्यांच्यावर दाऊदच्या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे, त्यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय आहे, असा सवालही संजय राऊत यांनी केला.
"सदनमध्ये बाजूबाजूला बसतात आणि पत्र लिहून नाराजी व्यक्त करतात. हे सर्व ढोंग आहे, असे ढोंग भाजप करत असते. वाटत असेल तर सदनमध्ये उभं राहून बोला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
"महायुती बिघाडणे हे ढोंग आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्याबाबत त्यावेळी अजित पवार, जयंत पाटील यांनी भूमिका घेतली होती. त्यावेळी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर भाजपच्या नेत्यांनी जी भाषणे केली ते पाहण्यासारखे आहे. आता मलिक बाहेर सुटले आहे ते आता सत्ताधारी बाकावर जाऊन बसले आहेत. आता ते पत्र देऊन नैतिकतेच्या डरकाळ्या फोडत आहेत. आता ते सत्तेपेक्षा देश महत्वाचा सांगत आहेत, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.