मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 08:29 AM2024-10-22T08:29:55+5:302024-10-22T08:30:18+5:30
मनसेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची केली जाणार परतफेड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मनसेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा घोषित केला होता. त्याची परतफेड म्हणून मनसेच्या काही जागांवर महायुती पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी गुप्त बैठक झाल्याचीही चर्चा आहे.
या कथित गुप्त बैठकीत मनसेला महायुतीचा पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. हा पाठिंबा मुंबईतील शिवडी, वरळी आणि माहिम आदी मतदारसंघांसाठी असेल. माहिममध्ये मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर वरळी या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात उतरणार अशी चर्चा
आहे.
राज ठाकरेच सांगू शकतील: किल्लेदार
कोणत्या पक्षासोबत युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय आमच्या पक्षात राज ठाकरेच घेत असतात. त्यामुळे या चर्चेबाबत ते स्वत:च सांगू शकतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यात या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
राज यांचे महायुतीत स्वागतच: शिरसाट
मतांचे विभाजन होऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीसोबत आले पाहिजे. महायुतीने आजपर्यंत त्यांचा सन्मानच राखला आहे. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून कधी अंतर ठेवून वागले नाहीत. त्यांना आमच्यासोबत येण्यास हरकत नसावी. आले तर त्यांचे स्वागतच करू असे शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले.