मुख्यमंत्री परतताच विस्ताराची चर्चा, अधिवेशनापूर्वी विस्तार करण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:19 AM2018-06-19T05:19:51+5:302018-06-19T05:19:51+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा नव्याने होऊ लागली आहे. मात्र, विस्ताराबाबत असलेल्या अडचणींवर मात करून नागपूरच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार करणे मुख्यमंत्र्यांना शक्य होईल का या बाबत साशंकता आहे.

Talks of expansion on the return of Chief Minister, problems of extension before the convention | मुख्यमंत्री परतताच विस्ताराची चर्चा, अधिवेशनापूर्वी विस्तार करण्यात अडचणी

मुख्यमंत्री परतताच विस्ताराची चर्चा, अधिवेशनापूर्वी विस्तार करण्यात अडचणी

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा नव्याने होऊ लागली आहे. मात्र, विस्ताराबाबत असलेल्या अडचणींवर मात करून नागपूरच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार करणे मुख्यमंत्र्यांना शक्य होईल का या बाबत साशंकता आहे.
विस्ताराबाबत प्रसिद्धी माध्यमांतून गेले काही दिवस चर्चा होत आहे. नागपूरच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी (४ जुलै) विस्तार करणार असल्याचे सूतोवाच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सूत्रांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचा तसा प्रयत्न असला तरी विस्तार अधिवेशनानंतर केला जाऊ शकतो. कारण विस्ताराबाबत भाजपात बरीच गुंतागुंत निर्माण झाली आहे. काही ज्येष्ठ सहकाºयांकडून विस्तार लवकरात लवकर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे.
मंत्रिमंडळातून कोणाला वगळायचे आणि कोणाला संधी द्यायची या बाबतचा अंतिम निर्णय होण्यात अडचणी जात आहेत. सुमार कामगिरीच्या आधारे चार मंत्र्यांना डच्चू देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा असली तरी सामाजिक, विभागीय संदर्भ लक्षात घेता त्या मंत्र्यांना घरी पाठविणे शक्य होताना दिसत नाही. मंत्रिमंडळाचा चेहरा अधिक कार्यक्षम करण्याचा फेरबदलाचा उद्देश असावा असे मुख्यमंत्र्यांना वाटते. मात्र, तसे करणे तेवढे सोपे नसल्याचे चित्र आहे.
अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की कामगिरीच्या आधारे ज्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणे अपेक्षित आहे त्यात मुंबईतील दोन मंत्री आहेत. त्यातील एकास घरी पाठवले जाईल आणि दुसºयास एक तर डच्चू मिळेल किंवा कमी महत्त्वाचे खाते दिले जाईल. बाहेरून भाजपात आलेल्या आमदारांपैकी एकदोघांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह आहे तर त्यांच्यापैकी एकदोघांना महामंडळांवर संधी देऊन मंत्रिपदाची संधी किमान या सरकारमध्ये तरी मूळ भाजपावाल्यांनाच दिली पाहिजे, असा दुसरा मतप्रवाह आहे.
मित्रपक्ष शिवसेनेलाही मंत्र्यांमध्ये काही बदल करायचे आहेत का या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. अधिवेशनापूर्वी ही चर्चा करून शिवसेनेकडून नवीन नावे घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागणार आहे. नागपूर अधिवेशनासाठी आता १५ दिवस बाकी आहेत. त्या दरम्यान विधान परिषदेच्या चार जागांसाठी २५ जून रोजी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जून रोजी मुंबईत येत आहेत.
>मुनगंटीवार यांची मोघम प्रतिक्रिया
कुणाला मंत्री करायचं याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून विचार करुनच आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे होईल, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. मात्र, भाजपची कोअर कमिटी आणि मित्रपक्षांशी चर्चा करून विस्तार योग्य वेळी करण्यात येईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Talks of expansion on the return of Chief Minister, problems of extension before the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.