लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या मे महिन्यापासून आतापर्यंत व्याजदरामध्ये १.९० टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई महापालिका क्षेत्रात घरांच्या विक्रीत मात्र वाढ नोंदली गेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८७५६ घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या घरांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात १५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. व्याजदरात वाढ झाल्याचा फटका गृहविक्रीवर होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी घर खरेदीस प्राधान्य दिल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे घर विक्री थंडावली होती. मात्र, यंदा २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये घर विक्रीने जोर पकडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सरत्या ११ महिन्यांत मुंबई शहरांत एकूण १ लाख २० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. सन २०१३ पासून सरत्या नऊ वर्षांत प्रथमच एका वर्षाच्या आत झालेला घर विक्रीचा हा उच्चांक आहे.
असा आहे घर विक्रीचा ट्रेन्ड नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एकूण घर विक्रीपैकी ४६ टक्के घरे ही ५०० ते १ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. यापेक्षा लहान आकारमानाच्या घर विक्रीचे प्रमाण हे ३६ टक्के इतके आहे. १ ते २ हजार चौरस फूट क्षेत्रफळांच्या घर विक्रीचे प्रमाण १६ टक्के इतके आहे. २ हजार चौरस फुटांवरील क्षेत्रफळाच्या घर विक्रीचे प्रमाण हे २ टक्के इतके आहे.
उपनगरातील घरांना जास्त मागणी
घरांच्या विक्रीपैकी ८८ घर विक्री ही प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांत झाल्याचे दिसून येते. तर १२ टक्के मालमत्तांची विक्री ही मुंबई शहरात झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात पश्चिम उपनगरात ५३ टक्के घरांची विक्री झालेली आहे. याच कालावधीमध्ये पूर्व उपनगरात ३५ टक्के घरांची विक्री झालेली आहे. मध्य मुंबईत ६ टक्के घरांची विक्री झालेली आहे. मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या दक्षिण मुंबईत ६ टक्के घरांची विक्री झालेली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात दक्षिण मुंबईतील घर विक्रीमध्ये १ टक्का वाढ नोंदली गेली आहे.