कोकण रेल्वे मार्गावरही होणार टॅल्गो हायस्पीड ट्रेनची चाचणी?
By admin | Published: August 20, 2016 10:28 PM2016-08-20T22:28:43+5:302016-08-20T22:51:36+5:30
चाचणी यशस्वी झाल्यास या मार्गावरही टॅल्गो हायस्पीड ट्रेन १२० ते १४० प्रतितास वेगाने धावतील,
प्रकाश वराडकर--रत्नागिरी--कोकण रेल्वे मार्गावर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न रेल्वे रुळ दुुभंगण्याच्या समस्येमुळे याआधीच भंगले होेते. आता स्पॅनिश कंपनीच्या टॅल्गो हायस्पीड ट्रेनच्या चाचण्या कोकण रेल्वेच्या मुंबई-गोवा या मार्गावरही घेण्याची उत्सुकता संबंधित कंपनीने दाखविली आहे. रेल्वे खात्याकडूनही त्याला अनुकुलता दर्शविण्यात आली आहे. चाचणी यशस्वी झाल्यास या मार्गावरही टॅल्गो हायस्पीड ट्रेन १२० ते १४० प्रतितास वेगाने धावतील, अशी चर्चा कोकण रेल्वे महामंडळातही सुरू झाली आहे.कोकण रेल्वेने देशातील अन्य रेल्वे विभागांपेक्षा अनेक वेगळे प्रयोग केले व ते यशस्वीही झाले. त्याचाच भाग म्हणून २००३मध्ये कोकण रेल्वेला हायस्पीड रेल्वेचे वेध लागले होते. त्यावेळी कोकण रेल्वे मार्गावरून १६० किलोमीटर प्रतितास वेगाच्या हायस्पीड ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणी यशस्वीही झाली होती. परंतु, त्याचकाळात कोकण रेल्वे मार्गाचे रूळ काही ठिकाणी दुुभंगले. मार्गावर काही मोठे अपघात झाले. त्यामुळे मार्गावरील रुळांच्या तपासणीचा विषय पुढे आला. त्यानंतर हा हायस्पीडचा विषय मागे पडला होता. परंतु, केंद्रात सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून अनेक सुविधांना मुकलेली कोकण रेल्वे विविध सुविधांबाबत हायस्पीड झाली आहे. आता मार्गावरील रेल्वे हायस्पीड करण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावर अनेक नवीन सुविधा निर्माण झाल्या आहेत. डिंगणी - जयगड मालवाहतूक मार्गही होणार आहे. कोकण रेल्वेला जोडणाऱ्या चिपळूण-कऱ्हाड मार्गासाठीही करार झाला आहे. कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. कोकण रेल्वे विजेवर चालविण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. अनेक स्थानकांवर, रेल्वेंमध्ये बायो टॉयलेट उभारण्यात आली आहेत.
सौरऊर्जा प्रकल्प रत्नागिरीत सुरू झाला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलेटर तर अनेक स्थानकांवर एस्कलेटर उभारण्यात आले आहेत. स्थानकांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. पॅसेंजर लिफ्ट, वॉटर कुलर्स सुविधा देण्यात आली आहे. क्लोरिनेशन प्लांट, फ्री वाय-फाय, कोकण रेल्वे वेबसाईट, टक्कर अवरोधक यंत्रणा, स्वयंचलित कोच वॉशिंग मशीन यासारख्या अनेक बाबतीत कोकण रेल्वेने भारतातील अन्य रेल्वेंना मागे टाकले आहे.
अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थिती असतानाही मार्गावर येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्या कमी करण्यात यश मिळवलेली कोकण रेल्वे आता हायस्पीड होण्याकडे वाटचाल करीत आहे. हायस्पीडचे जे स्वप्न २००३मध्ये भंगले ते आता स्पॅनिश कंपनीच्या टॅल्गो हायस्पीड ट्रेनमुळे पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाच्या मान्यतेने नवी दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर या हायस्पीड ट्रेनच्या चाचण्या यशस्वीरित्या सुरू आहेत. त्यानंतर या चाचण्या कोकण रेल्वे मार्गावरही घेतल्या जाणार आहेत. स्पॅनिश कंपनीही त्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे.
१२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने या चाचण्या होणार आहेत. १६० किलोमीटर प्रतितास वेगाची चाचणी २००३मध्ये यशस्वी झाल्याने त्यापेक्षा कमी वेगाच्या चाचण्या निश्चितच कोकण रेल्वेमार्गावर यशस्वी होतील. यासाठी टॅल्गो कंपनीचीही तयारी आहे.
या रेल्वेमुळे कमी वेळात मुंबई-गोवा प्रवास होईल व प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अधिक गाड्याही या मार्गावरून धावतील, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही वाटत आहे.
कोकण रेल्वे मार्गासाठी ही एक मोठी खबर आहे. या मार्गावर एवढ्या मोठ्या वेगाने जाणारी ही पहिलीच रेल्वे आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.
ही रेल्वे ताशी १२० ते १४० कि.मी. वेगाने धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर ही चाचणी लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ती आता कधी होणार? याबाबत मात्र गुप्तता आहे.