मुंबई : तळोजा कारागृहात गैरवर्तन करत नसल्याचे प्रत्युत्तर गँगस्टर अबू सालेमने विशेष टाडा न्यायालयात सादर केले आहे. सालेम कारागृहात गैरवर्तन करतो. त्याच्या बराक बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना तेथून जाण्यास सांगतो. माझ्या बराकबाहेर पोलीस तैनात करू नका, असे कारागृह प्रशासनाला सांगतो. तसेच बराकाच्या लोखंडी सळ्यांवर डोके आपटून घेईन असे धमकावतो, अशी तक्रार करणारा अर्ज तळोजा कारागृहाने विशेष टाडा न्यायालयात केला आहे.गेल्या महिन्यात कारागृहात मोबाईल असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बरकांची झडती घेतली. पण सालेमने त्याच्या बराकाची झडती घेऊ दिली नाही. मी डॉन आहे. मला नियम सांगू नका, असे त्याने पोलिसांना धमकावले, असेही कारागृह प्रशासनाने तक्रारीत नमूद केले आहे. याचे सालेमने प्रत्युत्तर सादर केले आहे. मी कारगृहात गैरवर्तन केलेले नाही. उलट कारागृह अधिक्षकच मला त्रास देतात, असा दावा सालेमने केला आहे. त्यामुळे यावर आता न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सालेमला २००५ मध्ये पोर्तुगालमधून ताब्यात घेण्यात आले. त्याला फाशीची शिक्षा होणार नाही, अशी हमीही भारत सरकारने पोर्तुगालला दिली आहे. सध्या सालेमविरोधात १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा खटला सुरू आहे. याआधी बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्येप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आर्थररोड मध्यवर्ती कारागृहात गँगस्टर मुस्तफा डोसाने सालेमवर हल्ला केला. त्यामुळे सालेमला तळोजा कारगृहात ठेवण्यात आले. तेथेही त्याच्यावर हल्ला झाला आहे.
तळोजा कारागृहात गैरवर्तन करत नाही
By admin | Published: August 16, 2015 2:17 AM