तळोजा कारागृह कैदी मारहाण प्रकरण : सहा तुरुंगाधिकाऱ्यांविरुद्ध वर्षभरानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:02 AM2018-12-24T07:02:31+5:302018-12-24T07:02:46+5:30
तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, जेलमधील सहा तरुंगाधिकाºयांविरुद्ध नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- जमीर काझी
मुंबई : राज्यातील कारागृहातील गैरकारभार व दुरवस्थेची प्रकरणे चव्हाट्यावर येत असतानाच, तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, जेलमधील सहा तरुंगाधिकाºयांविरुद्ध नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने कारागृहातील गैरव्यवस्थेबद्दल तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर ही कारवाई करण्यात आली. ३ जानेवारीला त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती.
प्रकाश ज्ञानोबा पाईकराव, श्रीनिवास धर्मचा पातकाला, अमित चंद्रकांत गुरव, बापुराव भीमराव मोटे, महेशकुमार माळी व अतुलकुमार वसंतराव काळे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, गुरुवारी रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदावर कार्यरत आहेत. यापैकी पाईकराव व पातकाला वगळता अन्य चौघांना निलंबित करण्यात आले आहे. कैदी जोरावरसिंह बलकारसिंह याची बहीण वीरेंद्र कौर हिने दिलेल्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाने कारागृह महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली.
एका न्यायाधीशाच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बलकारसिंह हा २०१५पासून तळोजा कारागृहात आहे. त्याला भेटण्यासाठी त्याची बहीण वीरेंद्र कौर ही त्याला भेटण्यासाठी कारागृहाच्या अभ्यांगत कक्षात गेली असता, सुरुवातीला तिला भेट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर भेट दिली असता, बलकारसिंह अन्य एकाचा आधार घेत लंगडत तिथे आला. नवीन वर्षात पैसे न दिल्याबद्दल ३ जानेवारीला सकाळी अधिकाºयांनी आपल्या हातावर, चेहरा व दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे तीनदा बेशुद्ध पडल्याचे त्याने बहिणीला सांगितले. त्यानंतर, वीरेंद्र कौर हिने या प्रकरणी अलिबाग न्यायालयात अर्ज दिल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, बलकारसिंह याच्यावर सुरुवातीला वाशी व नंतर जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या दोन्ही पायांना फॅक्चर झाले होते. जेल प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्यात आल्याने, वीरेंद्र कौर हिने या प्रकरणी उच्च न्यायालयात संबंधितांविरुद्ध धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंग महासंचालकांना सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यामध्ये तुुरुंगाधिकाºयांनी संगनमताने खोटे पेपर बनवून बलकारसिंह याने स्वत:हून हातापायांना जखम करून घेतल्याचा बनाव केल्याचे उघड झाले. या प्रकरणी संबंधित अधिकाºयांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले होते. मात्र, या प्रकरणी तब्बल दोन महिने उलटूनही अधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. याबाबत २० डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने, त्याच्या पूर्वरात्री सहा जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन
बराकीमध्ये २ जानेवारीला रात्री कैद्यामध्ये भांडण झाल्यानंतर बलकारसिंह याला अन्यत्र हलविण्यात आले. दुसºया दिवशी सकाळी तुरुंगाधिकाºयांनी बेदम मारले. मात्र, त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज हटविण्यात आल्याचा संशय आहे. वास्तविक, गंभीर घटना घडल्यास त्याचे फुटेज स्वतंत्र पेन ड्राइव्ह, सीडीत जतन करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन झाले.
... तर जबाबदारी कारागृह प्रशासनाची
भावाला निर्दयपणे प्राणघातक मारहाण झाली. तुरुंगाधिकाºयांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करायला हवे होते. त्याविरुद्ध आपण पुन्हा न्यायालयात दाद मागणार आहोत. अजूनही पैशांची पूर्तता न केल्यास मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. त्याच्या जिवाला काही धोका झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे कारागृह प्रशासनावर असेल.
- वीरेंद कौर, कैद्याची बहीण व याचिकाकर्ती
तपासानंतर पुढील कारवाई
सहा तुरुंगाधिकारी व अन्य अज्ञात कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल. - प्रदीप तिडकर, वरिष्ठ निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे