मेट्रोला महापालिकेची तंबी; उडणारी धूळ रोखा, प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रणा उभारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:05 PM2023-11-07T13:05:13+5:302023-11-07T13:05:36+5:30
सध्या तरी पालिकेने धडक कारवाई सुरू केलेली नाही. मात्र, ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर कारवाईला सुरुवात होईल.
मुंबई : पालिका मुख्यालयासमोर बांधकाम सुरू असलेल्या कुलाबा - वांद्रे-सिप्झ मेट्रो - ३ प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेने मेट्रो - ३ ला दिले आहेत. केवळ मेट्रो - ३ च नव्हे तर सर्वच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे सांगण्यात आले आहे.
पालिकेच्या एका पथकाने मेट्रो ३ च्या बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी केली. जिथे बांधकाम सुरू आहे, ज्या ठिकाणी धूळ उडण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी हिरव्या कपड्याचे आच्छादन उभारावे, अशी सूचना प्रकल्पस्थळावरील संबंधितांना करण्यात आली. महापालिकेने जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत त्यांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या तरी पालिकेने धडक कारवाई सुरू केलेली नाही. मात्र, ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर कारवाईला सुरुवात होईल.
मार्गदर्शक तत्त्वे
पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीत. बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकल, पत्र्याचे शेड उभारण्यासाठी १५ दिवसांची, तर स्मॉग गन बसवण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे ज्या ठिकाणी उल्लंघन होत आहे, त्या ठिकाणी तूर्तास इशारा देणाऱ्या आणि उपाय योजण्यास सांगणाऱ्या नोटिसा पाठवल्या जात आहेत.
कमांड सेंटरची उभारणी
विविध भागांतील प्रदूषणाची माहिती संकलित करण्यासाठी कमांड सेंटर उभारण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.
त्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. या कमांड सेंटरमधून हवेची गुणवत्ता समजण्यास मदत होईल.
ज्या विभागात हवेची गुणवत्ता अधिक खराब आहे, प्रामुख्याने सेंटर उभारण्याबाबत चाचपणी सुरू आहे. कमांड सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.