तमिळ, तेलुगू, कन्नडचा समावेश पण मराठी भाषेला अद्यापही 'अभिजात दर्जा' नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:00 AM2019-02-27T09:00:56+5:302019-02-27T09:01:33+5:30
पंधरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
मुंबई - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा ही चिरंतन आहे; परंतु अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित होत आहे. मराठी ही मातृभाषा असून, ती मागे का पडत आहे? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु, मराठी भाषेला आतापर्यंत अभिजात दर्जा मिळू शकला नाही.
पंधरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पुढे संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांनीही हा दर्जा मिळवला. उच्च कुलीन या अर्थाने प्रचलित असलेल्या अभिजात या शब्दाला पुढे प्रबोधनकाळात श्रेष्ठ दर्जाचा असा अर्थ प्राप्त झाला. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रामुख्याने श्रेष्ठता हाच निकष लावलेला आहे.
प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे या दजार्साठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे चारही निकष पूर्ण करीत असूनही तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला 52 बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी..याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्या या सर्व बोली महत्त्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, भुजंग मेश्राम, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, राम नगरकर, आनंद विंगकर, राजन गवस, मच्चींद्र कांबळी, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ या सार्यांमुळेच मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऐवज देऊन तिला श्रीमंत केले. असे असतानाही मराठी भाषेला श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. असे सांगत, साहित्यिक, कवींनी मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव असल्याची खंत यापूर्वी व्यक्त केली होती.
त्यामुळे हवाय अभिजात दर्जा
मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न झाले आहेत. हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातली एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोट्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी भाषा या कसोट्या निश्चितपणे पूर्ण करते. केंद्र सरकारने देशातील सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.