Join us

‘वर्षा’ बंगल्याबाहेर टमरेल आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:55 AM

मुंबई : महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, ती मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ आहेत.

मुंबई : महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, ती मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ आहेत. महिला स्वच्छतागृहांबाबत सरकारी उदासीनतेच्या विरोधात ‘राइट टू पी’ चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानासमोर ‘टमरेल’ आंदोलन केले.मुंबईत महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. याबाबत ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मुंबईच्या महापौरांना आणि आयुक्तांना निवेदने दिली, तक्रारी केल्या. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. वारंवार हा मुद्दा उपस्थित करूनही, त्याकडे दुर्लक्ष करणाºया पालिका प्रशासनाने मुंबईला हागणदारीमुक्त शहर घोषित करत, जखमांवर मीठ चोळल्याची भावना चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थान गाठले. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारल्याने, कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्याबाहेरच घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यानंतर, मलबार हिल पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. दरम्यान, शिवसेना उपनेत्या, आमदार नीलम गोºहे यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनला जाऊन ‘राइट टू पी’च्या महिला कार्यकर्त्यांची भेट घेत, त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई