- जयंत होवाळ मुंबई - अनेक छोट्या हॉटेलांच्या बाहेर तंदुरी- कबाबचा घमघमाट सुटलेला असतो. हे पदार्थ भाजताना मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. हा धूर जाण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसते. साहजिकच हा सगळा धूर वातावरणात पसरला जातो आणि प्रदूषणाला हातभार लागतो. आतापर्यंत खाद्यपदार्थाच्या नावाखाली होणाऱ्या या प्रदूषणाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. मात्र आता पालिकेची नजर तिकडे वळली आहे. खाद्यपदार्थ तयार करताना होणाऱ्या धुराचा बंदोबस्त करा, हॉटेलच्या बाहेर भट्ट्या लावू नका, असा इशारा पालिकेने दिला आहे.
या संदर्भात पालिकेने हॉटेल व्यावसायिकांची संघटना ''आहार'' शी संपर्क साधून संबंधित हॉटेलवाल्याना प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करण्यास सांगा, अशी सूचना केली आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने सात महिन्यापूर्वीच प्रदूषण नियंत्रण नियमावली तयार केली होती, मार्गदर्शक तत्वे आखली होती. त्यात प्रदूषण करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा, बेकऱ्यांचाही समावेश होता. मात्र सुरुवातीच्या काळात पालिकेने बांधकामामुळे आणि विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे मुख्य लक्ष केंद्रित केले होते. प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई, प्रदूषण रोखण्यासाठी रस्ते धुणे , डीप क्लीन मोहीम अशा विविध स्तरावर प्रयत्न सुरु होते.आता पालिकेने तंदूर भट्ट्याकडे मोर्चा वळवला आहे.
मुंबईत अनेक लहान हॉटेलांच्या बाहेर तंदूर- कबाब भाजण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. प्रत्येक विभागात अशा भट्ट्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पदार्थ भाजताना मोठ्या प्रमाणावर धूर होतो. मात्र खाण्याची बाब असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. या भट्ट्या आता पालिकेचे लक्ष असतील.मध्यन्तरी पालिकेने प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील धुरांडी आणि चिमण्या यांच्यावर कारवाई केली होती. या भागात दागिने घडवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. हे काम करत असताना निर्माण होणार धूर चिमण्यांमधून बाहेर सोडला जातो. मात्र कोणतीही प्रक्रिया न करता धूर सोडला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने या चिमण्यांवर कारवाई केली होती